पुणे : शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रात महापालिकेकडून लॉकडाऊनशी 100 टक्के अंमलबजावणी करण्याचा आदेश 11 मे रोजी काढण्यात आला. त्यानंतर या भागात अत्यावश्यक सेवांची दुकानेही 17 मे पर्यंत बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या भागातील नागरिकांना अत्यावश्यक असलेले अन्नधान्याचे तब्बल 8 कोटी रूपयांची तब्बल 70 हजार कीट पालिका प्रशासनाकडून वाटण्याचा निर्णय घेण्यात आला. तर 21 मे पर्यंत सुमारे 50 हजार कीट वाटप करण्यात आली आहेत. मात्र, या वाटपात पालिका पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याचा प्रकार समोर आला आहे.
महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, उपमहापौरांचा प्रभाग असलेल्या कसबा- विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत तब्बल 12 ह्जार 300 कीटचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे या कीट वाटपात हस्तक्षेप झाल्याचे समोर येत असून खरचं ती गरजूंना मिळाली का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
शहरात तिसऱ्या लॉकडाऊन नंतर महापालिकेने केंद्रशासन व राज्यशासनाच्या सूचनेनुसार, शहरात 69 प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करत उर्वरीत शहरात काही प्रमाणात लॉकडाऊन शिथील केले तर 11 ते 17 मे या कालावधीत या 69 प्रतिबंधित क्षेत्रात 100 टक्के लॉकडाऊन जाहीर केले. त्यात, यावेळी मेडीकल दुकानेही बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या भागातील नागरिकांची उपासमार होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने या प्रतिबंधित भागातील नागरिकांची गैरसोय रोखण्यासाठी सुमारे 70 हजार नागरिकांना अन्नधान्याचे कीट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात, पीठ, साखर, तेल, तांदूळ, चहा पावडर, मसाला, दुधपावडर, डाळ अशा वस्तूंचा समावेश होता.
प्रत्यक्षात ज्या भागात अधिक रूग्ण त्या भागातील अधिक नागरिकांना हे कीट देणे अपेक्षीत होते. मात्र, भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय वगळया इतर रूग्ण संख्या सर्वाधिक असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांना डावलत महापालिकेचे सर्वाधिक पदाधिकारी असलेल्या कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत हे कीट सर्वाधिक वाटप करण्यात आले आहे. 10 मे पर्यंत 299 रूग्ण होते. मात्र, कीट सुमारे 12 हजार 300 वाटप करण्यात आले आहे. याच दिवशी ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 401 रूग्ण होते त्या भागात केवळ 6900 कीट देण्यात आली आहेत.तर येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 282 रूग्ण असताना 5 हजार 400 कीट देण्यात आले आहेत. त्यामुळे इतर क्षेत्रीय कार्यालयाच्या तुलनेत रूग्ण संख्या समान असतानाच; या क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक कीट कसे वाटण्यात आले असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तर भाजपचे आमदार तसेच सर्वाधिक नगरसेवक असलेल्या भागातच हे कीट वाटप झाल्याचाही आरोप होत आहे.