पालिकांसाठी दोन सदस्यांचा प्रभाग

मुुंबई पालिकेसाठी एक सदस्यीय वॉर्ड पद्धत : शासनाचा लवकरच निर्णय
पिंपरी (प्रतिनिधी) – राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये प्रभागाची रचना बदलण्यात येणार असून मुंबई वगळता इतर महापालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबईमध्ये मात्र एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीची अंमलबजावणी होणार असून याबाबत लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय होणार असल्याची माहिती, माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली.

आकुर्डीत आज अजित पवार यांनी शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पवार म्हणाले, राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर काही धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये बदल करण्याबाबतच चर्चा सुरू आहे. संपूर्ण राज्यासाठी एक सदस्यीय वॉर्ड रचना किंवा दोन सदस्यीय प्रभाग पद्धत अंमलात आणण्याबाबत महाआघाडीतील तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये बोलणी सुरू आहेत.

राज्यातील प्रमुख कार्यकर्ते व नेतेमंडळींचीही मते ऐकूण घेतली जात आहेत. त्यानुसार एक किंवा दोन सदस्यीय प्रभागापेक्षा अधिकचा प्रभाग नसावा, असेच सर्वांनी सूचित केले आहे. त्यामुळे मुंबईत एक सदस्याचा वॉर्ड तर इतर सर्व महापालिकांमध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीची अंमलबजावणी करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. तीनही पक्षांचे नेते या नव्या रचनेबाबत सकारात्मक असल्याचेही पवार म्हणाले. राज्यातील महापालिकांच्या प्रभाग रचनेत बदल करून भाजपाने चार सदस्यीय प्रभाग पद्धत आणल्यामुळे अनेक महापालिकांमध्ये यश मिळविणे भाजपाला सोपे गेले होते. आता पुन्हा प्रभाग पद्धतीत बदल केला जाणार असून भाजपाला अडचणीत आणण्यासाठी नवी रचना केली जाण्याची शक्‍यता अजित पवारांच्या वक्तव्यामुळे निर्माण झाली आहे. एक किंवा दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा फायदा महाआघाडीलाच होणार आहे.

एक सदस्यीय वॉर्ड रचना करा
यावेळी कार्यकर्त्यांनी एक सदस्यीय वॉर्ड रचनाच अंमलात आणावी, अशी जोरदार मागणी केली. एक सदस्यीय वॉर्ड रचनेचा राष्ट्रवादीला फायदा होईल, असा दावाही करण्यात आला. यावर तीन पक्षांचे सरकार असून सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल मात्र दोन सदस्यांच्या प्रभागाबाबत सर्वजण अनुकल असल्याचेही पवार म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)