आमदार जगताप, लांडगेंसह आयुक्तांनाही सूचक इशारा
पिंपरी (प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर इथल्या आमदारांनी शहराची वाटणी करून घेतली आहे. पिंपरीतून जाणाऱ्या महामार्गा पलिकडे याचे आणि अलिकडे त्याचे अशी वाटणी झाल्याचे कानावर आले आहे. महापालिकेत भ्रष्टाचार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेतली जाणार असून इथल्या कारभारात काही चुकीचे आढळल्यास सोडणार नाही, असा सज्जड दम राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज (शनिवारी) दिला. शहरातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यासह आयुक्तश्रावण हर्डीकर यांचे नाव न घेता या तिघांनाही अजित पवारांनी सूचक इशारा दिला आहे.
आकुर्डीत आज अजित पवार यांनी शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेविका मंगला कदम, उषा वाघेरे, शीतल काटे, निकीता कदम, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, दत्ता साने, अजित गव्हाणे, मोरेश्वर भोंडवे, शाम लांडे, मयूर कलाटे, पंकज भालेकर, डब्बू आसवानी, राजू मिसाळ, रोहित काटे, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, किरण मोटे, मच्छिंद्र तापकीर तसेच सर्व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच शहरात आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास करूनही राष्ट्रवादीला महापालिका निवडणुकीत मतदारांनी नाकारले. महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली. पालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर इथल्या आमदारांनी शहराची वाटणी करून टाकली. शहराचे दोन हिस्से करून निम्म्या हिस्स्यावर एक आमदार तर निम्म्या हिस्स्यावर दुसरा आमदार अशी वाटणी झाल्याच ऐकण्यात आल आहे. महापालिकेत देखील बरीच भ्रष्टाचाराची प्रकरणे झाल्याच्या तक्रारी आहेत. घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, कचरा उचलण्याचा करार, डस्टबिन टेंडर, वायसीएम घोटाळा, सोशल मीडिया एक्सपर्ट नियुक्ती, कृत्रीम पाणी टंचाई अशा अनेक प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचे पुढे येत आहे. या सर्व तक्रारींची दखल घेतली जाणार असून त्यामध्ये काही चुकीचे आढळल्यास कोणालाही सोडणार नाही, असा थेट इशाराच पवारांनी दिला.
अडीच वर्षांपासून महापालिकेवर दोन्ही आमदारांचा कब्जा आहे. दोन्ही आमदारांच्या इशाऱ्यावरच आयुक्त चालत असल्याची स्थिती आहे. भ्रष्टाचाराचेही अनेक आरोप झाल्यानंतर आयुक्तांनी आपली भूमिका नेहमीच गुलदस्त्यात ठेवत आमदारांच्या सूचनेवरच कारभार हाकला. या सर्व प्रकारावर अजित पवार यांनी थेट बोट ठेवल्याने पालिकेचा कारभार अडचणीत येण्याची वर्तविण्यात येत शक्यता आहे.
आझमभाई पानसरे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर
शहरातील ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी अद्यापपर्यंत राष्ट्रवादीत प्रवेश केला नसून ते भाजपामध्येच आहेत. असे असतानाही त्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र निहाल पानसरे हे देखील उपस्थित होते. पानसरे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून देखील ओळखले जात होते. मात्र 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला फटका बसला होता. महापालिकेत सत्ता आल्यानंतरही भाजपाने पानसरे यांचे राजकीय पुनर्वसन केले नव्हते. यामुळे ते भाजपावर नाराज असल्याची चर्चा होती. अधिकृतपणे त्यांनी भाजप सोडल्याचे जाहीर केले नव्हते. मात्र आज पानसरे यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावल्याने पानसरे हे राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
अजित पवारांचे “जंगी स्वागत’
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज पिंपरी-चिंचवड शहरात जंगी स्वागत करण्यात आले. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ते शहरात आले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. आकुर्डी येथे शनिवारी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने अजित पवारांच्या उपस्थित आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आकुर्डी येथे अजित पवार दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी तसेच ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. गेल्या पाच वर्षांतील सर्वात जंगी स्वागत अशीच चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.