सक्षम व्यक्तीच सुवर्णयुगाच्या स्वप्नांचा ध्यास घेईल

महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव
पिंपरी (प्रतिनिधी) – देशाचा सक्षम आणि सक्रिय नागरिक भारताच्या सुवर्णयुगाच्या स्वप्नांना गवसणी घालेल. हा नागरिक जबाबदारीने त्याची कर्तव्ये पार पाडेल. प्रत्येक जण देशहितासाठी खारीचा वाटा उचलेल, असे मत निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्‍वस्त मंदार देव महाराज उपस्थित होते.
धर्माधिकारी म्हणाले, भारताला संस्कृतीचा भव्य वासरा आहे. अनेक परकीय आक्रमणांना परतवून लावण्याची ताकद या वारशामध्ये आहे. शक, कुशाक, ग्रीक, हुन, अरबी अशा अनेक सत्तांनी भारतावर आक्रमण केले. मात्र, भारतीय संस्कृतीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. कालांतराने ते भारताचे बनले. ही आपल्या संस्कृतीची ताकद आहे. एकसंघ भारत ही भविष्याची जागतिक महासत्ता होऊ शकते. ही भीती इंग्रजांना होती. त्यासाठी इंग्रजांनी भारतात फूट पाडली. पण स्वातंत्र्याच्या वेळी सगळी संस्थाने खालसा करून भारतात सामील झाली. त्यामुळे पुन्हा भारत एकसंघ झाला.

सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका त्यासाठी महत्त्वाची ठरली. काश्‍मीरबाबत असलेले 370 आणि 35 (अ) कलम रद्द करून काश्‍मीरची दुखरी जखम देखील आता बरी झाली आहे. निवडणुकांमध्ये आजही काळा पैसा गटाराच्या पाण्यासारखा वाहतो. भारतात बाह्य विविधता आहे. मात्र, अंतर्गत एकताच आहे. ही एकताच भारताला सुवर्णयुगाकडे घेऊन जाणार आहे, असे मत धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.