पिंपरी – शिवसेना नेते आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, हवेलीचे माजी आमदार गजानन धरमशी बाबर यांचे आज (दि. 2) खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी ते 79 वर्षांचे होते.
गेल्या दोन महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बंधू माजी नगरसेवक प्रकाश बाबर, मधुकर बाबर, तीन बहिणी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गजानन बाबर मूळचे वाई (जि. सातारा) येथील होते. व्यापार – नौकरीनिमित्त पिंपरी- चिंचवड शहरात वास्तव्यास आले होते. अंगभूत गुण आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठे प्रस्थ निर्माण केले. रेशन फेडरेशनचे अध्यक्ष, गजानन लोकसेवा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदावर ते आजपर्यंत कार्यरत होते.
पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेच्या वाटचालीत त्यांचा मोठा वाटा होता.
काळभोरनगर येथून ते शिवसेनेच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आले. तीनवेळा ते नगरसेवक होते. तर 1992-93 मध्ये महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पूर्वीच्या हवेली विधानसभा मतदारसंघातून बाबर यांनी सलग दोनवेळा विजय प्राप्त केला होता. तर 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. नव्याने निर्माण झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी दणदणीत विजय मिळवित संसदेत प्रवेश केला.
मोठी राजकीय ताकद
बाबर यांची मोठी राजकीय ताकद आहे. राजकीय क्षेत्राबरोबरच ते व्यापारी संघटनेमध्येही सक्रिय होते. एलबीटी हटाओ आंदोलनात त्यांनी पुढाकार घेत व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देतानाच एलबीटी बंद करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. रेशन दुकानदारांच्या समस्या सोडविण्यासाठीही ते नेहमीच आग्रही असायचे. पिंपरी-चिंचवडसोबतच सातारा. जिल्ह्यातील राजकारणात तसेच किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातही त्त्यांचा दबदबा होता.
पक्षबदल आणि घरवापसी
2014 साली विद्यमान खासदार असतानाही शिवसेनेने लोकसभेला उमेदवारी नाकारल्यानंतर बाबर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. सन 2017 साली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मात्र सन 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत घरवापसी केली होती.
पुरस्कार आणि संस्था, संघटना
संसदेतील उत्कृष्ट कामाबद्दल बाबर यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला होता. तर सलग दोनवेळा संसदरत्न पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. गजानन बॅंकेची स्थापना त्यांनी केली होती. तसेच ते राज्य फेअर प्राईस शॉपकिपर्स असोसिएशन, गजानन व्यापारी संघ, सायबर कॅफे असोसिएशन, टेम्पो असोसिएशन, नवनगर विकास शिक्षण संस्था, ट्रेडर्स असोसिएशन, जय भवानी फाउंडेशन, जिजामाता नागरी सहकारी पतसंस्था, राष्ट्रतेज तरुण मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पहात होते. तर काही काळ त्यांनी पिंपरी-चिंचवड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते.