चाकणमधील घटना ः आई व बहीण गंभीर जखमी
महाळुंगे इंगळे -रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन मायलेकरांना भरधाव दुचाकीची धडक बसली. यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर त्याची आई व बहीण यात गंभीर जखमी झाली आहे.
हा अपघात चाकण गावच्या हद्दीतील एकतानगरमध्ये गुरुवारी (दि. 12) सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास झाला. स्वराज गणेश बांगर (वय 3 वर्षे, रा. एकनतानगर, चाकण; मूळ रा. मातावळी, ता. आष्टी, जि. बीड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. त्याची आई जयश्री गणेश बांगर (वय 27) व बहीण सानिका (वय 7) अशी गंभीर जखमी झालेल्या मायलेकींची नावे आहेत.
चाकण पोलिसांनी राहुल सुनील कोळेकर (वय 24, रा. ठाकूर पिंपरी, ता. खेड) या दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती अशी की, जयश्री बांगर ह्या गुरुवारी (दि. 12) सकाळी त्यांचा मुलगा स्वराज व मुलगी सानिका यांना बरोबर घेऊन रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात होत्या. त्याचवेळी राहुल कोळेकर मोटार सायकल (एमएच 14 जीआर 7555) घेऊन नाशिककडून पुण्याकडे भरधाव जात होता, त्यावेळी त्याच्या दुचाकीची जोराची धडक बसून हा अपघात झाला.