पारनेर – करोना आजाराची साथ पसरू नये, म्हणून पारनेर, सुपा, भाळवणी, निघोज, कान्हूरपठार, वडझिरे येथील आठवडे बाजार या आठवड्यात बंद ठेवण्याचा निर्णय तहसीलदार ज्योती देवरे यांनी घेतला आहे.
करोना आजारावर उपाययोजना करण्यासाठी तहसीलदार देवरे यांनी पारनेरमधील अधिकारी, डॉक्टर, औषध विक्रेते यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी देवरे म्हणाल्या, करोना आजाराविषयी सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. सर्व यंत्रणांनी अशा अफवांना वेळीच रोखले पाहिजे.
अशा अफवा पसरू नयेत, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. यावेळी तहसीलदार देवरे यांनी सर्वांना आजाराच्या उपाययोजना करण्याची विषयी शपथ दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लालगे यांनी कोरोना विषयी माहिती दिली. मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र औटी, डॉ. संदीप औटी, डॉ. बाळासाहेब कावरे यांनी काही सूचना मांडल्या. यावेळी नायब तहसीलदार रमेश काथवटे, पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, राजेश गवळी, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश लालगे, मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत, योगेश मते, डॉ. प्रमोद पितळे, अरुण भंडारी, उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी उपाययोजना करण्याची मागणी
आठवडे बाजार व इतर शासकीय कार्यक्रम रद्द झाले आहेत. मात्र विद्यार्थी ज्या शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत, त्याठिकाणी प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी खेड्यापाड्यांतून शिक्षणासाठी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी पालकांतून करण्यात येत आहे.