124 रुग्णांचा डिस्चार्ज : एकूण रुग्णसंख्या -3230
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन 213 रुग्णांची नोंद करण्यात आली. शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 3230 वर पोहचली आहे. तर आज शहरातील 124 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. करोनाने उच्चांक केला असतानाच बुधवारी एक दिलासादायक बाब ही घडली. गेल्या पंधरा दिवसांपासून करोना रोज रुग्णांचा बळी घेत होता, त्याला बुधवारी ब्रेक लागला. दिवसभरात एकाही रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला नाही.
शहरातील रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. बुधवारी दिवसभरात शहरातील 201 रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये 118 पुरुष व 83 महिलांचा समावेश आहे. तर शहराबाहेरील 11 जणांना करोनाची लागण झाली. त्यामध्ये 5 पुरुष व 6 महिलांचा समावेश आहे. शहराबाहेरील देहूरोड, मावळ, बीड, इंदापूर, सिंहगडरोड, चाकण, नांदेड, बोपोडी, मामुर्डी या ठिकाणचे आहेत. सद्यस्थितीत शहराबाहेरील 76 रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर शहरातील 1193 रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत शहरातील 47 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
आमदारांच्या संपर्कातील 128 जणांचे अहवाल निगेटिव्ह
भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना सोमवारी करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील 128 जणांची करोना चाचणी करण्यात आली. त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये 128 जण करोना पॉझिटिव्ह नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व आमदार महेश लांडगे यांची शुक्रवारी बैठक झाली होती. आयुक्तांनी स्वतःला होम क्वांरटाईन केले आहे. तसेच त्यांचाही तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आमदारांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून मी करोना पॉझिटिव्ह असल्याचे सोशल मीडियावर सांगितले. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियावर व्यक्त होण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर गेट वेल सून दादा अशा पोस्ट टाकल्या जात आहेत. तसेच विविध प्रकारचे कार्टून टाकून दादा करोनाला घाबरत नाहीत असा संदेश दिला जात आहे. सोशल मीडियावर सुरु असलेल्या या पोस्टमुळे आमदारांना झालेल्या करोनाची शहरभर चर्चा रंगली आहे.
जिल्हा रुग्णालयात दोघांचा करोनाने मृत्यू
सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात करोनाने बुधवारी (दि. 1) खडकी येथील दोघांचा मृत्यू झाला. 38 वर्षीय महिला आणि 65 वर्षीय वृद्धाचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 25 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. करोनाबाधित मृत झालेल्या दोघा रुग्णांना मधुमेह आजार होता. दरम्यान, रुग्णालयात आज आणखी 7 करोनाबाधित रुग्णांची भर पडली. बाधितांमध्ये खडकी येथील दोघांचा समावेश आहे. येरवडा, जुनी सांगवी, थेरगाव, देहूगाव आणि मुळशी तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाला करोनाची लागण झाली आहे. बाधितांमध्ये 4 पुरूष आणि 3 महिला रुग्ण आहेत. औंध येथील 80 वर्षीय ज्येष्ठ महिलेने करोनावर मात केली. त्यामुळे त्यांना आज उपचार करून घरी सोडण्यात आले. रुग्णालयात सध्या 31 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.