कोपरगाव -कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी दोन तास मुसळधार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अचान आलेल्या पावसाने संपूर्ण शहर जलमय झाले होते. शहरातील गांधीनगर, सुभाषनगर, निवारा रोड परिसर, बैलबाजार रोड, मोहनीराजनगर, कालेमळा या भागातील अनेक घरांमध्ये व दुकानांत पाणी शिरले. त्यात त्यात संसारोपयोगी वस्तूंचे व दुकानातील साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
घरात व दुकानांत पाणी शिरल्याने अनेकांना रात्र जागून काढण्याची वेळ आली. शहरातील निवार रोड, नेहरु भाजी मंडई, मोरे व्यापारी संकुल, इतर संकुलांत चार फुटांपेक्षा जास्त पाणी व गाळ साचला होता. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने काही भागातील नागरिकांना मदकार्य करुन दिलासा दिला. काही भागांत पावसामुळे वृक्ष उन्मळून पडले होते. शहरातील गटारींना नदीचे स्वरूप आले होते. गटारी तुंबल्याने दूषित पाणी रस्त्यावर आले होते.