एकाचे उपोषण, तर दुसऱ्या गटाने तहसीलदारांना दिले बांधकाम करण्याचे निवेदन
पारनेर – पारनेर न्यायालयाचा वाद पारनेरमध्ये चांगलाच पेटला असून त्यातून दोन गट तयार झाले आहे. एका गटाने न्यायालयाच्या स्थलांतर होवून नये म्हणून उपोषण सुरू केले असून दुसऱ्या गटाने बांधकाम सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे.
पारनेर न्यायालयाचे बांधकाम तातडीने सुरू करून स्थलांतर पारनेर सुपा रस्त्यावरील गट नंबर 96 मध्ये करावे, अशी मागणी पारनेरमधील रहिवाशांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना शनिवारी निवेदनाद्वारे केली. पारनेर न्यायालयाचे स्थलांतर व्हावे, यासंबंधी निवेदन गजानन औटी, राजेंद्र चेडे, संतोष औटी, दिलीप खोसे, योगेश देशमाने, सचिन औटी, रायभान औटी, प्रशांत औटी,आदीनी दिले.
दुसरीकडे पारनेर संघर्ष समितीच्या वतीने सुभाष कापरे यांनी गेल्या सहा दिवसांपासून पारनेर पोलीस ठाण्यासमोर पारनेर न्यायालयाची स्थलांतर होऊ नये, यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यासंबंधीचा पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांपासून थेट सामाजिक न्यायमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत करण्यात आला आहे. परंतु त्यावर अद्याप कोणत्या तोडगा न निघाल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे.
त्यातच पारनेर येथील सुपा रस्त्यावर असणाऱ्या कन्हेर ओहोळ येथील रहिवाशांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन देवून या न्यायालयाच्या जागेत तातडीने बांधकाम करण्यात येऊन स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी पण लेखी निवेदनाद्वारे शनिवारी केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सध्या न्यायालय असलेल्या जागेत वाहन तळाची व्यवस्था नसल्याने फार मोठी गैरसोय होत आहे.तसेच पारनेर न्यायालयाच्या परिसरात सर्व बाजूने अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात असल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे पारनेर सुपा रस्त्यावरील असणाऱ्या गट नंबर 96 हे पारनेर न्यायालयचे स्थलांतर करून पारनेर न्यायालयासह व इतर सर्वसामान्य ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. पारनेर न्यायलयाचे स्थलांतर होऊ नये व स्थलांतर व्हावे यासाठी दोन स्वतंत्र गट तयार झाल्याने प्रशासनापुढे फार मोठा पेच निर्माण झाला आहे. यासंबंधी निवेदनाच्या प्रती राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना सुद्धा देण्यात आलेले आहे.