बॅंकेची चूक असल्याचे सांगत महामार्ग प्राधिकरणाचे हात वर
टोलचा झोल उघड करावाच लागणार
पुणे – गाडी घरी असतानाही, टोल नाक्यावर पैसे कपात झाल्याच्या प्रकरणात आता नवा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दैनिक “प्रभात’ने याबाबत दिलेल्या वृत्ताची दखल घेत महामार्ग प्राधिकरणाने पाटस टोल नाक्यावर तपासणी केली. त्यात आणखी एका वाहनचालकाकडे याच क्रमांकाचा फास्टॅग असल्याचे समोर आले आहे. या दुसऱ्या फास्टॅगला पुण्यातील वाहनधारकाचे बॅंक ऑफ महाराष्ट्रचे खाते जोडलेले आहे.
एकाच क्रमांकाचा फास्टॅग दोन वेगवेगळ्या गाड्यांच्या क्रमांकावर कसा नोंद झाला? तर, एकच बॅंक खाते दोन फास्टॅगला कसे जोडले गेले? याबाबत महामार्ग प्राधिकरणाकडे माहिती नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याच वेळी प्राधिकरणाने बॅंकांना फास्टॅग वाटपाचे अधिकार दिले असले, तरी या प्रकाराला बॅंकाच जबाबदार असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत महामार्ग प्राधिकरणाचा एकही अधिकारी अधिकृतपणे बोलण्यास तयार नाही.
प्रकरण नेमके काय?
महापालिकेचे कर्मचारी सुरेश परदेशी यांच्याकडे एमएच 12 जेए 0717 या क्रमांकाची ऍम्बेसेडर कार आहे. ती घराशेजारीच उभी आहे. त्यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रमधून 5 ऑगस्ट 2021 रोजी फास्टॅग खरेदी केला होता. त्यात 500 रुपये बॅलन्स होता. फास्टॅग घेतल्यानंतर त्यांची गाडी कधीही बाहेर गेलेली नव्हती. 27 ऑक्टोबर रोजी परदेशी नेहमीप्रमाणे साडेनऊ वाजता कार्यालयात गेले. त्यानंतर 10 वाजून 04 मिनिटांनी त्यांना मोबाइलवर पाटस टोल नाक्यावर त्यांच्या गाडीच्या फास्टॅग मधून 85 रुपये कपात झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे गाडी घरीच असताना पैसे कसे गेले? असा प्रश्न परदेशी यांना पडला दरम्यान, पुन्हा 11 वाजून 49 मिनिटांनी परदेशी यांच्या खात्यातून सरडेवाडी येथील टोलमधून 85 रुपये, तर 12 वाजून 18 मिनिटांनी वरवडे येथील टोल नाक्यावर 70 रुपये कापले गेले.
टोल नाक्यावर गाडी दुसरीच
दैनिक “प्रभात’ने दिलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत महामार्ग प्राधिकरणाने तपासणी केली असता, एक स्विफ्ट कार पाटस टोल नाक्यावरून गेली आहे. या कारवरही फास्टॅग लावलेला नव्हता. तो चालकाच्या खिशातच होता. तो स्कॅन केल्यानंतर परदेशी यांच्या खात्यातून पैसे गेले. त्यामुळे खात्यावर पैसे जमा झाल्याने गाडी पाटस टोलनाक्यावरून सोडण्यात आली. पुढे ती सोलापूर रस्त्याकडे आणखी दोन टोल नाक्यांवर गेली. मात्र, या प्रकाराशी महामार्ग प्राधिकरणाचा संबंध नसून बॅंकांनी फास्टॅग देताना एकच क्रमांक टाकल्याने अथवा चुकीच्या पद्धतीने नोंदणी केल्याचा प्रकार घडल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाने केला आहे. तर, परदेशी यांनी बॅंकेशी संपर्क साधल्यानंतर बॅंकेनेही त्यांना समाधानकारक उत्तर दिलेले नाही. तर प्राधिकरणाचे काही अधिकारी दुसरा फास्टॅग बॅंक ऑफ बडोदाचा आहे, तर काही अधिकारी आयसीआयसीआय बॅंकेचा आहे अशी गडबडीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे ही नेमकी चूक कोणाची? तसेच परदेशी यांचे झालेले नुकसान कोण भरून देणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
“प्रभात’कडे वाचकांच्या तक्रारी
परदेशी यांच्याबाबतीत घडलेल्या प्रकारचे वृत्त दिल्यानंतर अनेक वाचकांनी “प्रभात’शी संपर्क साधून अशाच प्रकारे त्यांचेही पैसे गेल्याच्या तक्रारी केल्या. त्यात एक वाचक वरिष्ठ शासकीय अधिकारी असून काही वर्षांपूर्वी ते महापालिकेत उपायुक्तही होते. तर भुकूम येथील एका शासकीय कर्मचारी महिलेची स्विफ्ट गाडी घरीच असताना 20 ऑगस्ट 2022 रोजी त्यांच्या फास्टॅगच्या बॅंक खात्यातून कराडजवळील तासवडे टोल नाका येथे सुमारे 95 रुपयांचा टोल कापला गेल्याचे या वाचकाने सांगितले. त्यामुळे अनेक नागरिकांच्या बाबतीत असे प्रकार घडत असले, तरी तक्रारीसाठी सक्षम यंत्रणा नसल्याने तसेच तक्रारीनंतर महामार्ग प्राधिकरणाकडून अपेक्षित उत्तरे मिळत नसल्याने नागरिक पुढे येत नसल्याचे चित्र आहे. तर महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारीही “1033 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा,’ असे सांगत वेळ मारून नेत आहेत.