श्रीगोंद्यात दोन डझन नेत्यांना आमदारकीची हुलकावणी…

अर्शद आ. शेख
श्रीगोंदा – श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून 62 वर्षांत फक्त चार जणांना आमदारकीची संधी मिळाली आहे. या दरम्यान तब्बल दोन डझन नेत्यांना आमदारकीने हुलकावणी दिली आहे.

सहा दशकांत तालुक्‍याचे सर्वाधिक वेळा नेतृत्व करण्याची संधी मिळाली ती बबनराव पाचपुते यांना. ते सहा वेळा जिंकले अन्‌ तीस वर्षे आमदार राहिले. त्यानंतर बाबूराव भारस्कर यांना पंधरा वर्षे व तीन टर्म सलग (1962 ते 77) आमदारकी मिळाली. ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांना दोन टर्म (1978 व 1999) आमदारकी लाभली. मात्र 1980 ला विधानसभा भंग झाल्याने नागवडे यांना आमदारकीची ती टर्म फक्त 28 महिने भूषविता आली. 2014 ते 2019 मध्ये राहुल जगताप आमदार होते हे सर्वश्रुत आहेतच. 1962 ते 2019 पर्यंत फक्त वरील चारच नेत्यांनीच आमदारकीची उब अनुभवली.

दुसऱ्या बाजूने विचार केला, तर 1962 ते 2014 पर्यंत तब्बल पंचवीस नेत्यांना आमदारकीने हुलकावणी दिली. या दोन डझन पैकी अनेक नेते मोठ्या फरकाने आमदारकी पासून वंचित राहिले. 1962 ला बाबुराव भारस्कर (कॉंग्रेस) विरुद्ध प्रभाकर रोहन (आरपीआय) हीच एकमेव निवडणूक दुरंगी झाली. 1972 व 1978 या दोन निवडणुका तिरंगी झाल्या. उर्वरित सर्व निवडणुका बहुरंगी होत्या. 1990 मध्ये सर्वाधिक म्हणजे 14 उमेदवार रिंगणात होते. बसपा व दूरदर्शी पार्टी यांनी येथे दोन वेळेस नशीब आजमावले. 1960 ते 75 पर्यंत श्रीगोंदा तालुका हा लाल बावटा या डाव्या पक्षाचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र या पक्षाने तालुक्‍यात एकदाही विधानसभा लढल्याची नोंद नाही.

प्रभाकर रोहम, के. जी. शिंदे, मोहनराव गाडे, कुंडलिकराव जगताप, आदिनाथ चिडे, बापूसाहेब जामदार, बाबासाहेब भोस, घनश्‍याम शेलार, सुदाम जवणे, भगवंत खरात, नंदू पाटील, कैलास शेवाळे, अनिल घनवट, राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार, नंदकुमार बोरुडे, हेमंत ओगले.
यापैकी बाबासाहेब भोस यांनी दोन वेळा कॉंग्रेस बंडखोर म्हणून निवडणूक लढवली, तर 1999 ला ते नगर दक्षिणचे लोकसभेचे उमेदवार होते. 1985 पासून अनेक वेळा कॉंग्रेस नेत्यांनी विधानसभेला उमेदवारीचे आश्वासन दिले व ते पाळले नाही.

ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे हे 1978 पासून ते 2004 पर्यंत सहा वेळा कॉंग्रेसचे उमेदवार होते. हा देखील एक विक्रमच होय. पैकी दोनदाच ते जिंकले. कुंडलिकराव जगताप 1980 ला पहिली निवडणूक लढले. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. उमेदवारी देऊ म्हणून कॉंग्रेसने त्यांना अनेकदा वेटिंगवर ठेवले. भाजपने देखील 2004 व 2009 ला असाच अपेक्षाभंग केला. सर्वधिक वेळा संधी गमावणाऱ्यांमध्ये जगताप व भोस ही नावे अग्रेसर राहतील. तुलनेने पहिली व एकमेव निवडणूक लढवून जिंकणाऱ्या नशीबवान उमेदवारात राहुल जगताप (राष्ट्रवादी) यांचे नाव अग्रभागी राहील.

ऍड. डांगे, घोडके यांची संधी हुकली

ऍड. सुभाष डांगे (कॉंग्रेस) यांना 1985 ची श्रीगोंद्यासाठी उमेदवारी दिल्लीहून जाहीर झाली होती. तेव्हाचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या हस्तक्षेपाने ती बदलली गेली. कर्जत-जामखेड राखीव मतदारसंघातून 1985 ला श्रीगोंद्याचे मल्हारराव घोडके यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली होती. तीसुद्धा ऐनवेळी बदलून विठ्ठल भैलुमे यांना देण्यात आली. डांगे व घोडके यांच्यासाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे व शंकरराव चव्हाण यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. 

Leave A Reply

Your email address will not be published.