आतापर्यंत पावणेसहा कोटी रुपये जप्त

आचारसंहिता काळात गस्ती पथकाचे कडेकोट नियोजन ः पोलीस प्रशासनाची माहिती
सर्वाधिक रोकड दौंड तालुक्‍यातून जप्त केल्याची माहिती

पुणे – आचारसंहिता लागू झाल्यापासून पुणे शहर आणि जिल्ह्यात पोलिसांकडून जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त लावून तब्बल 5 कोटी 64 लाख 60 हजार रुपयांचा काळा पैसा जप्त केला आहे. त्यामध्ये पाच कोटी रुपयांचे दागिने आणि अन्य रक्कम रोख स्वरूपातील आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आचारसंहिता कालावधीमध्ये ग्रामीण पोलिसांनी आळेफाटा, मंचर, राजगड, शिरूर आणि दौंड याठिकाणी नाकाबंदीदरम्यान कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक दौंड तालुक्‍यात 30 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आळेफाटा येथे 4 लाख, मंचरमध्ये 3 लाख 67 हजार, राजगडमध्ये 1 लाख तर शिरूरमध्ये 93 हजार रुपयांची रोकड जप्त करून कारवाई करण्यात आली आहे.

तसेच बारामती तालुक्‍यात सोने, चांदी, हिरे बाळगणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 40 बॉक्‍स सोने, चांदी, हिरे असे एकूण 5 कोटी 25 लाख रुपयांचा एवज जप्त केला आहे. तर, दारूबंदीनुसार 247 जणांवर कारवाई करण्यात आली असून, 13 लाख 57 हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.
आचारसंहिता भंगप्रकरणी दोन गुन्हे दाखल
विधानसभा निवडणूक काळात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यावर ईडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जंगली महाराज रोडवरील भाजप कार्यालयातील पोस्टर्सवर शाईफेक करणाऱ्यांवर डेक्‍कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच वारजे पोलीस ठाण्यातही एका अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.