कसब्याच्या विकासासाठी अहोरात्र झटणार

महायुतीच्या उमेदवार मुक्‍ता टिळक यांचे आश्‍वासन
 
पुणे  – महापौर म्हणून शहरासाठी अनेक विकासकामे मार्गी लावण्यात यश आले. त्यासाठी केंद्र व राज्यशासनाकडून मिळालेले सहकार्य, गतिमानतेमुळेच हे शक्‍य झाले आहे. विश्‍वास दाखवत पक्षाने आता आपल्याला विधानसभेची संधी दिली आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी दिवस-रात्र झटणार असल्याचे कसबा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी मतदारांशी बोलताना सांगितले.

टिळक यांच्या प्रचाराची सांगती पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती येथे दुपारी विजयी संकल्प सभा घेत करण्यात आली. यावेळी टिळक यांनी मतदारांना भावनिक आवाहन करत विजयी करण्याचे आवाहन केले. खासदार गिरीश बापट, भाजपचे सरचिटणीस उज्वल केसकर, राजेश येनपुरे, शिवसेना नेते राजेंद्र शिंदे, बाळासाहेब मालुसरे, रिपाइंचे राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, छगन बुलाखे यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टिळक म्हणाल्या, “गेल्या दोन वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून नदीसुधार, एचसीएमटीआर, समान पाणी, भामा-आसखेड प्रकल्प, ई-बसेस अशा अनेक महत्त्वपूर्ण कामांचे निर्णय घेता आले. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने मान्यता देत दाखवलेली तत्परता आणि गतिमानता पाहता विकासाचा वेग भाजपच्या कालावधीत सर्वाधिक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तर आता राज्यशासनाची प्रतिनिधी म्हणून या मतदारसंघातून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मतदार मला नक्की संधी देतील.’

यावेळी खासदार बापट यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून केलेल्या विकासकामांची माहिती दिली. तसेच सुरू असलेल्या कामांचाही आढावा दिला. हा मतदारसंघ आमदार म्हणून रक्ताचे पाणी करून एकसंध ठेवला असून येथून पुढे तो एका सक्षम हातात असेल असा विश्‍वास बापट यांनी व्यक्त करत टिळक यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी स्वरदा बापट यांनीही मनोगत व्यक्त केले. या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी ओम अहिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.