खर्डा व नागोबाचीवाडी येथील बनावट दुध बनवण्याचे दोन अड्डे उध्वस्त !

जामखेड : जामखेड तालुक्यातील खर्डा भागातून बनावट दुध तयार करण्याचे आणखीन एक रॅकेट जामखेड पोलिसांनी उघडकीस आणले आहे. खर्डा व नागोबाचीवाडी येथील बनावट दुध बनवण्याचे अड्डे उध्वस्त करत 2118 लिटर बनावट दुध नष्ट करण्यात आले असुन तब्बल 2 लाख रूपये किमतीचे बनावट दुध बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ही धडाकेबाज कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध विभागाने पार पाडली आहे. याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील नागोबाचीवाडी येथील हरिभाऊ एकनाथ गोपाळघरे यांच्या मालकीच्या खर्डा व नागोबाचीवाडी येथील भगवानकृपा दुध संकलन केंद्रावर बनावट दुध तयार केले जात असल्याची गुप्त बातमी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना मिळाली होती.

या बातमीची खातरजमा होताच जामखेड पोलिसांनी तातडीने दि २८ रोजी सकाळीच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला सोबत घेत खर्डा भागात संयुक्त छापे टाकले. खर्डा भागातील नागोबाचीवाडी येथून ८७८ लिटर तर खर्डा येथून १२४० लिटर असा एकुण २११८ लिटर बनावट दुधाचा मोठा साठा हस्तगत केला. तर एक लाख नव्वद हजार किमतीचे बनावट दुध तयार करण्याची पावडर, केमिकल, व अन्य साहित्याचा साठा घरातून व दुध संकलन केंद्रातून जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेले बनावट दुध जागेवर नष्ट केले आहेत. तर बनावट दुध तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य अन्न औषध प्रशासनाने ताब्यात घेतले आहे.बनावट दुध तयार करण्याचे जप्त केलेल्या साहित्याचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुर्यवंशी यांनी दिली.

या कारवाईच्या पथकात पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात, अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुर्यवंशी,  तसेच जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक अविनाश ढेरे, पोलिस काँस्टेबल आबासाहेब आवारे, विजयकुमार कोळी, अरूण पवार, संदिप राऊत, महिला पोलिस काँस्टेबल कोमल भुंबे सह आदींचा सहभाग होता.अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त एस पी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई पार पाडली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.