नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या संवादात त्यांनी नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भातील वर्षभराचा आढावा घेतला. गेल्या वर्षी 29 जुलै रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं होतं. त्या धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त त्या धोरणांतर्गत आज पंतप्रधान मोदी यांनी देशातील आठ राज्यातील महाविद्यालयात मराठीसह पाच भारतीय भाषांमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची घोषणा केली आहे.
यासाठी केंद्राने आठ राज्यातील 14 अभियंत्रिकी महाविद्यालयात पाच मातृभाषेत अभ्यासक्रम सुरु करण्याची तयारी केली आहे. यामध्ये हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, बांगला अशा भाषांचा समावेश आहे. तर देशातील विविध 11 भाषांमध्ये हा अभ्यासक्रम भाषांतरीत केला जाणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील गरीब, मध्यम, दलित, आदिवासी वर्गातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. कारण या वर्गातील बहुतांश विद्यार्थ्यांना भाषेच्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. मात्र आता या विद्यार्थ्यांचा सामर्थ्य आणि कौशल्याचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.
प्रत्येक क्षेत्रात भारतीय तरुण पुढाकार घेत डिजीटल इंडियाला गती देत आहेत. या युवा पिढीच्या स्वप्नांनुसार वातावरण मिळेल त्यावेळी त्यांच्या शक्तीत किती वाढ होईल विचार करा. हे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण युवकांना विश्वास देते की देश त्यांच्यासोबत आहे. आर्टिफिशयल इंटेलिजन्स भारतीय युवकांना डिजीटल बनवेल.
भारतीय सांकेतिक भाषा अभ्यासक्रम दिव्यांगांसाठी उपयुक्त
नव्या शैक्षणिक धोरणात माध्यमिक पातळीवर विषय म्हणून भारतीय सांकेतिक भाषा अभ्यासक्रम विशेष उल्लेखनीय आहे. पंतप्रधानांनी या अभ्यासक्रमाची सुरुवात करत सांगितले की, सांकेतिक भाषेला प्रथमच एका विषयाचा दर्जा देण्यात आला आहे. आता विद्यार्थी तो एक भाषाविषय म्हणून अभ्यासू शकतील. यामुळे दिव्यांगांना मोठा फायदा होणार आहे. मोदींनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित वेबसाइट सुरू केली. तसेच अकॅडमिक बॅंक ऑफ क्रेडिटचा शुभारंभ केला. ती उच्च शिक्षणात अनेक पर्याय उपलब्ध करेल.
या नव्या योजनांचाही केला प्रारंभ
1. ग्रेड-1 च्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांचे नाटक आधारित शालेय तयारी मॉड्यूल
2. सीबीएसई शाळात ग्रेड-3, 5 आणि 8 यासाठी एक योग्यता आधारित मूल्यांकन आराखडा राबवणार
3. कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) केंद्रित खास वेबसाइट