सातारा : जिल्ह्यात कोरोनाने रौद्र रुप धारण केले असून दिवसेंदिवस बाधित आणि मृत्यूची संख्या चिंताजनक आहे. बाधितांचा आकडा वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सातारा, कोरेगाव, खंडाळा, खटाव, फलटण, कराड या तालुक्यांत करोनाचे सर्वाधिक हॉटस्पॉट आहेत. जिल्ह्यातील 27 हॉटस्पॉटमध्ये एकाच दिवसात 400 हून अधिक बाधित आढळल्याने जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडली आहे.
सातारा, कोरेगाव, खटाव, फलटण, खंडाळा, कराड तालुके हॉटस्पॉट ठरत असून बाधित आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. खटाव तालुक्यातील वडूज, कातरखटाव, रहाटणी, मायणी, नेर, पुसेगाव, बुध, डिस्कळ, औंध, सातारा तालुक्यातील मंगळवार पेठ, संभाजीनगर, गोडोली, शाहूनगर, सदरबझार, शाहूपुरी, नागठाणे, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव, एकंबे, रहिमतपूर, देऊर, अपशिंगे, पिंपोडे बुद्रुक, खंडाळा तालुक्यातील लोणंद, शिरवळ, पारगाव, खंडाळा, कराड तालुक्यातील मलकापूर, कार्वे, सैदापूर, सुपने, शनिवार पेठ, फलटण तालुक्यातील तरडगाव, विडणी, आदर्की, कोळकी, शनिवार पेठ, लक्ष्मीनगर आदी हॉटस्पॉट ठरत आहेत.
एकाच दिवसात वडूजमध्ये 15, कातरखटाव 16, बुध 18, औंध 13, शाहूपुरी 14, पिंपोडे बुद्रुक 10, कोरेगाव 17, रहिमतपूर 13, म्हसवड 25, लोणंद 32, शिरवळ 11, मसूर 13, मलकापूर 20, तरडगाव 15 आदी ठिकाणी मोठ्या संख्येने बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत आहे. प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून हॉटस्पॉट गावांमध्ये विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाचे संकट मोठे असून यासाठी यंत्रणा तोकडी आहे. मात्र, अनेक उपाययोजना राबवून जिल्हावासियांना वेळेत उपचार देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
– डॉ. सचिन पाटील (अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी)