मुंबई- उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबे याच्या दोन साथीदारांना दहशतवाद विरोधी पथकाने ठाण्यातून अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. अरविंद उर्फ गुडान रामविलास त्रिवेदी आणि दुबेचा चालक सुशीलकुमार उर्फ सोनू तिवारी अशी या दोघांची नावे आहेत.
हे दोघेही अलिकडेच झालेल्या 8 पोलिसांच्या हत्याकांडातील वॉन्टेड आरोपी आहेत. याशिवाय 2001 मध्ये उत्तर प्रदेशातील राज्यमंत्री संतोष शुक्ला यांच्या हत्येप्रकरणीही ते वॉन्टेड होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई एटीएसच्या जुहू पोलिसांच्या पथकाने या दोघांना ठाण्याजवळच्या कोलशेत येथून अटक केली.
कानपूरमधील बिकरू गावात 3 जून रोजी झालेल्या चकमकीनंतर दुबे, तिवारी आणि अन्य काही जणांनी पलायन केले होते. त्यापैकी तिवारी मुंबईमध्ये लपण्यासाठी आला असल्याची माहिती मुंबई एटीएसला मिळाली होती, असे एटीएसचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सांगितले. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोलशेत इथे या दोघांना अटक केली, असे देशमाने यांनी सांगितले.
प्राथमिक चौकशीदरम्यान उत्तर प्रदेशातील राजकीय नेते संतोष मिश्रा यांच्या हत्येत आणि इतर अनेक गुन्ह्यांमध्ये दुबेबरोबर आपणही सहभागी झालो होतो, हे तिवारीने कबूल केले आहे. या दोघांच्या अटकेची माहिती एटीएसने उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सला कळवली आहे.
कानपूर चकमकीमागील मुख्य सूत्रधार असलेला विकास दुबे हा शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बारा भागात पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या चकमकीत ठार झाला होता.