वाई -वाई पोलीस ठाण्यातील 12 कर्मचाऱ्यांना एकाच वेळी करोनाची बाधा झाल्याचा अहवाल सोमवारी (दि. 13) रात्री आल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वाई पोलीस ठाणे कटेंनमेन्ट झोन जाहीर करण्यात आला असून या पोलीस ठाण्याचा कारभार दोन दिवसांसाठी भुईंज पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यातील 60 पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या स्रावांचे नमुने मंगळवारी घेण्यात आले असून ते तपासणसाठी पाठविण्यात आले आहेत. सोनगीरवाडीतील चिकन विक्रेत्याच्या कुटुंबातील 16 जणांनाही एकाच वेळी करोनाची लागण झाली असून तालुक्यात एकाच दिवशी 29 जण करोनाबाधित झाले आहेत.
पाचवड येथील एका 32 वर्षांच्या तरुणाला लागण झाली आहे. जिल्ह्यात एकूण 15 पोलीस कर्मचारी बाधित असून त्यात कराड व शिरवळच्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आज वाई पोलीस ठाणे व नवीन करोना सेंटरला भेट दिली. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी संवादही साधला.
यावेळी पोलीस उपअधीक्षक अजित टिके व पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे उपस्थित होते. लॉकडाऊनच्या काळात नागरिक व व्यापाऱ्यांकडून नियमांची झालेली पायमल्ली, मुंबई, पुणे व परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे करोनाची साखळी खंडित करण्यात अपयश आले. वाई तालुक्यात बाधितांची झपाट्याने होत असलेली वाढ चिंताजनक आहे, असे प्रतिपादन सातपुते यांनी केले.
त्या म्हणाल्या, वाई पोलीस ठाण्याचे करोना योद्धेच त्याच्या विळख्यात अडकल्याने वाई तालुक्यात करोनाचे संकट गडद झाले आहे. वाईतील नागरिक व व्यापाऱ्यांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या आदेशांचे व नियमांचे काटेकोर पालन केल्यास करोनाची साखळी खंडित होण्यास मदत होईल.
तालुका प्रशासनानेही 17 जुलैपासूनच्या लॉकडाऊनच्या प्रभावी अमलबजावणीकडे लक्ष दिले पाहिजे. वाई शहरात आतापर्यंत एकूण 59 जण बाधित असून तालुक्यात बाधितांची एकूण संख्या 183 आहे. त्यातील 97 रुग्ण बरे झाले आहेत, तर 86 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने करोनामुळे सहा जणांना जीव गमवावा लागला आहे, सोमवारी आलेल्या रिपोर्टनुसार चिकन विक्रेत्याच्या कुटुंबातील नऊ महिला व सात पुरुष बाधित झाले आहेत.