मुंबई – टायगर श्रॉफ आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा पटणी या जोडीने भलेही आपल्या रिलेशनशिपबाबत आतापर्यंत स्पष्टपणे दुजोरा दिलेला नसला तरी त्यांच्या अफेयरची सतत चर्चा सुरू असते.
या दोघांचाही फॅन फॉलोइंग मोठा असून, हे दोघेही डिनर डेट्स, ड्राइव्ह आणि पार्टीमध्ये नेहमी एकत्र दिसून येतात. दरम्यान, या दोघांना एकत्र बाहेर फिरणं चांगलंच महागात पडलं आहे. काल मुंबईतील बँडस्टँड परिसरात हे दोघे कारमधून फिरत असताना यांना मुंबई पोलिसांनी रोखलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी दिशा आणि टायगर श्रॉफ हे जिममधून परतत होते. त्याचदरम्यान दोघेही फिरण्यासाठी मुंबईतील बँडस्टँड येते पोहोचले. येथे ते कारमधून दुसरी फेरी मारत असतानाच पोलिसांनी अचानक त्यांना रोखले. यावेळी टायगर श्रॉफ मागच्या बाजूला तर दिशा पुढे बसली होती.
त्यानंतर पोलिसांनी दोघांचेही आधारकार्ड तपासले. तसेच अन्य औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांना सोडून दिले. करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणीवर ही कारवाई केली गेली. सध्या सर्वत्र त्यांच्या या कारवाईची चर्चा रंगू लागली आहे.