उंब्रज – परप्रांतीयांच्या दोन गटात व्यवसायाच्या कारणावरुन मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास तुंबळ मारामारी झाली. घटनास्थळी परप्रांतीय युवकांचा मोठा जमाव जमा झाला होता. या घटनेची उंब्रज बाजारपेठेत दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, या घटनेने उंब्रजमध्ये अनाधिकृतपणे व्यवसायासाठी वास्तव्य करणाऱ्या शेकडो परप्रांतीयाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार, 4 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उंब्रज बाजारपेठत जुन्या साड्यांवर टप विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या उत्तरप्रदेश येथील परप्रांतीय युवकांचे दोन गट हातात काठ्या घेऊन समोरासमोर आले. बाजारपेठेत कमी साड्यांवर टप विकल्याच्या कारणावरून दोन गटात जोरात शिवीगाळ सुरू झाली.
त्यानंतर एकमेकात हाणामारी झाली. यावेळी शेकडो परप्रांतीय युवकांचा जमाव जमा झाल्याने स्थानिक नागरिकही आवाक झाले. या प्रकाराने बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात रफीक जाबीर अहमद (वय 26, मुळ रा. सदरपूर उत्तरप्रदेश, सध्या रा. काशिद गल्ली, उंब्रज याने तक्रार दिली. आक्रम निसार खान, इसरार निसार खान रा. रमदुआरी ता. महमुदाबाद, उत्तरप्रदेश सध्या रा. उंब्रज या दोघांवर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आहे. तर आक्रम निसार खान रा. रमदुआरी ता.महुदाबाद, (उत्तरप्रदेश) याने दिलेल्या तक्रारीनुसार रफीक जाबीर अहमद, श्रवण कोटीलाल धोबी मुळ रा. (उत्तरप्रदेश) या दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.