तेजस्वी सातपुते; पोलिसांच्या पेट्रोल पंपाचे कराडमध्ये भूमिपूजन
कराड – जिल्ह्यात प्रथमच पोलिसांचा पेट्रोल पंप हा कराडला सुरु होत आहे. पोलिसांप्रमाणेच या पंपावर चोवीस तास सेवा मिळेल. महिनाभरात हा पंप ग्राहकांच्या सेवेत रुजू होईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले. दरम्यान, पोलीस कॉलन्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती निधीतून साडेतीन कोटी आणि पोलीस वाहनांच्या खरेदीसाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
येथील नवीन पोलीस वसाहतीत साकारणाऱ्या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन पोलीस अधीक्षक सातपुते यांच्या हस्ते आज झाले. त्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस उपाधिक्षक सुरज गुरव, भारत पेट्रोलीयम कंपनीचे अधिकारी सुपले, गजेंद्र सिंह, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक सातपुते म्हणाल्या, पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंबाला देण्यासाठी वेळ नसतो. सुट्टीची खात्री नसते. त्यामुळे त्यांना तब्येतीकडेही लक्ष द्यायला वेळ नसतो. पोलीस कल्याण निधीतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, वह्या, पुस्तके, महिलांसाठी मातृत्व भत्ता, शैक्षणिक प्रवेशासाठी बिनव्याजी रक्कम उपलब्ध करणे आदी उपक्रम राबवले जातात. या पोलीस कल्याण निधीत वाढ होणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच सातारा आणि कराडमध्ये पेट्रोल पंप प्रस्तावित करण्यात आले होते.
त्यातील सातारच्या पंपाची जागा योग्य नसल्याने कराडलाच पहिला पंप सुरु करण्यात येत आहे. येत्या महिनाभरात पेट्रोलपंप सुरु होईल. तो चोवीस तास सुरु राहून चांगली सेवा देण्यासाठी तत्पर असेल. याप्रकारे पोलीस कल्याण निधी वाढवण्यासाठी जिल्ह्यातील फलटण, वडूज, कोरेगाव, सातारा आणि महामार्गावर पोलीस ठाण्यांच्या परिसरात व अन्य ठिकाणीही पेट्रोल पंप सुरु करण्यात येतील. अत्यल्प किंमतीत पोलिसांसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तूचे दालनही साताऱ्यात उपलब्ध केले आहे. पोलीस कल्याण निधी वाढवण्यासाठी असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
पोलीस उपाधिक्षक सुरज गुरव म्हणाले, सातारा जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी चांगले उपक्रम राबवले आहेत. विश्वासार्हता असणारा हा पोलिसांचा पंप ग्राहकांना चांगली सेवा देईल. पोलीस वसाहतीचा पंप हा एक भाग आहे. पोलिसांच्या बारा वसाहतीत एक सोसायटी सुरु करण्यात येत आहे. त्यातून वसाहत सुसज्ज करण्याचा मानस आहे.
भारत पेट्रोलीयम कंपनीचे सुपले म्हणाले, आमच्या कंपनीमार्फत वैयक्तीक लोकांना पंप दिले जातात. मात्र कराडला होणारा पंप हा सरकारी खात्यामार्फत सुरु होत आहे, याचा मला आनंद आहे. पोलिसांच्या पंपातून 24 तास सेवा मिळणार असून ग्राहकांत विश्वास निर्माण होवून चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. पोलिसांच्या पंपातून पोलीस कल्याण निधीलाही चांगला हातभार लागेल. येत्या महिन्यात पंपाचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावेळी पेट्रोल पंपासाठी पाठपुरावा करणारे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, कर्मचारी संजय जाधव यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. महेंद्र भोसले यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोडसे यांनी आभार मानले.