तुळजापूर – येत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani temple) 13 ऑक्टोबरपासून दररोज 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे.
13 व 14 ऑक्टोबर रोजी भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी अगदी परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे ही वेळ वाढवण्यात आली आहे. 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होऊन तुळजाभवनीच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे.
त्यानुसार भाविकांना देवीचे दर्शन सुलभतेने व्हावे यासाठी देवीचे चरणतीर्थ मध्यरात्री 1 वा. होणार आहे. त्यानंतर भाविकांना देवीच्या दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येणार आहे.
यासंबंधीच्या निर्णयानुसार, सिंहासन व पंचामृत अभिषेक पूजा सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होईल. रात्री 10.30 वा. प्रक्षाळ व शेजारती होऊन मंदिर रात्री 11 वा. बंद होईल.
या नियोजनामुळे भाविकांना सलग 22 तास तुळजाभवानीचे दर्शन घेता येईल. केवळ 2 तास मंदिर बंद असेल. उल्लेखनीय बाब म्हणजे विजयादशमीपासून तुळजाभवनीची 5 दिवसीय मंचकी श्रमनिद्रा सुरू होणार आहे.
कोजागिरी पौर्णिमेनंतर 29 ऑक्टोबर रोजी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर अश्विनी पौर्णिमेस सुरुवात होईल. यामुळे 28 ते 31 ऑक्टोबर या 4 दिवसांच्या कालावधीत तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी पुन्हा 22 तास खुले ठेवण्यात येणार असल्याचे मंदिर संस्थानने कळवले आहे.