Tuljabhavani Temple : राज्यात सध्या सुट्ट्यांचे दिवस सुरु आहेत. शनिवारी, रविवार आणि त्याला लागून सोमवारी नाताळची सुट्टी लागून आल्याने अनेकजण सुट्टीचे नियोजन करत असतात. त्यातच सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्वाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. याच सुट्टयांमुळे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता तुळजाभवानी मंदीर प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने येत्या 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत मंदीर पहाटे एक वाजता चरणतिर्थ होऊन भाविकांना दर्शनार्थ खुले करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. सुट्ट्यांच्या काळात दरवर्षी तुळजाभवानी मंदीरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे मंदिर प्रशासनाला देखील मोठी कसरत करावी लागते. या काळात भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण येऊन भाविकांना कमी वेळेत सुलभ दर्शन घडवण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून प्रयत्न केले जाते.
रांगेतून आलेल्या भाविकांना श्रीतुळजाभवानी मूर्तीचे सुलभ मुख दर्शन घडवण्यासाठी नाताळ सुट्टीनिमित्त मोठी गर्दी होते. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने 25 डिसेंबर रोजीचे चरणतीर्थ पहाटे एक वाजता होईल, असे स्पष्ट केले आहे.
सुट्ट्याच्या दिवसासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय
* 25 डिसेंबर रोजीचे चरणतीर्थ पहाटे एक वाजता होईल.
* 27 ते 31 डिसेंबर दरम्यान येणारे मंगळवार, शुक्रवार, रविवार व पौर्णिमा या दिवशी भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून सकाळचे
* चरणतिर्थ पहाटे 1 वाजता होऊन पुजेची घाट सकाळी 6 वाजता होईल.
* अभिषेक सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत व सायंकाळी 7 ते 9 वाजता या वेळेत संपन्न होतील.
* तसेच अभिषेक कालावधीत देणगी दर्शन बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंदीर प्रशासनाने केले आहे.
* पोर्णिमाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी 25 रोजी रात्री छबिना तर मंगळवार 26 रोजी रात्री छबिना व जोगवा व बुधवार 27 रोजी रात्री छबिना काढला जाणार आहे.