पालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची वर्णी?

महापालिकेत रंगताहेत चर्चा : हर्डीकर यांची होणार उचलबांगडी

पिंपरी – राज्यात भाजपाची सत्ता जावून महाआघाडीची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आयुक्त श्रावण हर्डीकर यांची उचलबांगडी होणार हे जवळजवळ निश्‍चित झाले आहे. त्यांच्या जागी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली असून सत्ताधारी भाजपावर मुंढे यांच्या माध्यमातून वचक निर्माण करण्याची विरोधकांनी रणनिती आखल्याचे बोलले जात आहे.

कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांचा बोलबाला आहे. महापालिकेत यापूर्वी अजित पवार यांनी पुढाकार घेऊन श्रीकर परदेशी यांना आयुक्तपदी बसविले होते. महापालिकेला शिस्त लावण्याची भूमिका अजित पवारांची होती. मात्र परदेशी यांनी अनधिकृत बांधकामांबाबत घेतलेल्या धडक भूमिकेकुळे राष्ट्रवादीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

सध्या भाजपाची सत्ता महापालिकेत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय गणिते पालिकेच्या आयुक्तपदी बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच राज्यातही महाआघाडीचे सरकार आल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी पुन्हा आपले बस्तान बसविण्याच्या तयारीत आहे. सध्या कार्यरत असलेले आयुक्त श्रावण हर्डीकर हे बदली करून घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या जागी कोण? अशी चर्चा गेले आठवडाभर महापालिकेत रंगली आहे. भाजपाला रोखण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्यापेक्षा दुसरा अधिकारी सध्या तरी मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे मुंढे यांना आणून भाजपाची गोची करण्याची रणनिती राष्ट्रवादीकडून आखली जात आहे.

पालकमंत्र्यांच्या निवडीनंतर बदल्या?
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील की अजित पवार यावरही सध्या चर्चा झडू लागल्या आहेत. मंत्रिमंडळात वर्णी लागल्यास अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री होणार हे निश्‍चित आहे. अजित पवार पालकमंत्री झाल्यास पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्राधिकरणातील त्यांचा हस्तक्षेप वाढणार आहे. शहराची खडान्‌ खडा माहिती असल्यामुळे अजित पवारांचीच भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अजित पवार हे पालकमंत्री बनल्यास शहर भाजपापुढील अडचणीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.

इतरही अधिकारी स्पर्धेत
तुकाराम मुंढे यांच्यासोबतच इतरही काही अधिकाऱ्यांची नावे स्पर्धेत असल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सन 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याची रणनिती आतापासून आखली जात आहे. याचाच एक भाग म्हणून अजित पवार हे त्यांच्याच मर्जीतील आयुक्‍त दोन्ही महापालिकांमध्ये बसविणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे मुंढे यांच्यासोबतच इतरही काही अधिकाऱ्यांच्या नावावर चर्चा असून हे अधिकारी देखील स्पर्धेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)