पुणे – करोनावरील लस लवकरच नागरिकांसाठी उपलब्ध होईल. त्याच्या भारतातील उत्पादनासाठी अर्ज केला आहे. त्याला परवानगी मिळाल्यास अन्य लसींचे उत्पादन थांबवून आम्ही सर्व लक्ष या लसीच्या निर्मितीवर केंद्रित करू. मोठे उत्पादन करून भारताबरोबरच अन्य विकसनशील देशांनाही याचा योग्य दरात पुरवठा करण्याचा आणि अन्य लस उत्पादकांच्या तुलनेत स्वस्तात पुरवण्याचा आमचा मानस आहे, असे पूनावाला ग्रुप आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी स्पष्ट केले.
‘फिक्की फ्लो’ पुणे चॅप्टरच्या वतीने अध्यक्षा डॉ. अनिता सणस यांच्या पुढाकारातून वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फ्लो पुणे चॅप्टरच्या माजी अध्यक्षा सबिना संघवी यांनी पूनावाला यांच्याशी संवाद साधला. यावेळी फ्लोच्या राष्ट्रीय अध्यक्ष जानबी पूखन प्रमुख अतिथी होत्या. यावेळी फ्लो पुणे चॅप्टरच्या उषा पूनावाला आदी सहभागी झाले होते.
या लसीच्या फेज 1 आणि 2 ची चाचणी ऑस्ट्रियात सुरू आहे. आम्हाला परवाना मिळाल्यावर ती आम्ही भारतात बनवणार आहोत. त्याच्या पुढच्या फेजची चाचणी पुढील काही आठवड्यांत भारतात होईल. या लसीचे दुष्परिणाम नाहीत. हलकीशी डोकेदुखी, बारीक ताप येऊ शकतो. लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यास या वर्षाअखेर लस नागरिकांसाठी उपलब्ध होईल, असे डॉ. पूनावाला यांनी नमूद केले.
काही वेळा या विषाणूतील बदलाविषयी कोणतेही ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे हा प्रयोग फसण्याची शक्यता फारच कमी आहे, असे सांगून डॉ. पूनावाला म्हणाले, लस निर्मिती कर्मचाऱ्यांना या संसर्गाचा धोका असल्याने या लसीचा पहिला प्रयोग आमच्या कर्मचाऱ्यांसाठी व्हावा, अशी विनंती भारत सरकारला केली आहे. सरकारी अनुदान या उत्पादनासाठी पुरणारे नसल्यामुळे त्या भरवशावर आम्ही न राहता आम्हाला शक्य तेवढे जास्त व देणगीदारांच्या मदतीवर अधिकाधिक उत्पादन करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
बीसीजी लस फायदेशीर
कोविड 19 ची लस जीवन वाचवणारी आहे; परंतु तोवर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ‘बीसीजी’ची लस ही अत्यंत फायदेशीर ठरू शकते. आपण लहानपणी एकदा लस घेतल्यावर पुन्हा घेत नाही. मात्र, आता दुसरा डोस घेतल्यास त्याने रोगप्रतिकारशक्ती वाढून संसर्गाशी लढण्याची ताकद मिळू शकते, अशी माहिती त्यांनी दिली.