वॉशिंग्टन- करोनाव्हायरसच्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा उपयोग होतो. भारतामध्ये बऱ्याच कंपन्या हे औषध मोठ्या प्रमाणात तयार करीत आहेत. सध्याच्या कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाचाच्या काळात भारताने हे औषध अमेरिकेला द्यावे असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे.
काल करोना व्हायरसचा मुकाबला कसा करावा, या संदर्भात ट्रम्प व मोदी यांच्या दरम्यान प्रदीर्घ चर्चा झाली. भारत अनेक वर्षापासून अनेक कंपन्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या तयार करीत आहे. त्यामुळे याचा भारताकडे मोठ्या प्रमाणात साठा आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत भारताला याची गरज लागू शकते म्हणून भारताने या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. अमेरिकेने भारताकडे या औषधाच्या ऑर्डर दिलेल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मागणीवर गंभीरपणे विचार करीत आहेत असे ट्रम्प यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. ट्रम्प यांनी सांगितले की, मीसुद्धा गरज पडल्यास हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळी घ्यायला मागेपुढे पाहणार नाही. मोदी यांच्याबरोबर झालेली चर्चा फलदायी झाली असल्याचे त्यांनी अमेरिकेतील करोनाव्हायरस वर काम करणाऱ्या कृती दलाला सांगितले.
भारतामध्ये एक अब्जपेक्षा जास्त लोक आहेत त्यांनाही या गोळ्यांची गरज असणार आहे. याची आपल्याला जाणीव आहे. मात्र भारतामधील उत्पादन फारच मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारताने अमेरिकेच्या विनंतीचा विचार करावा असे आपण मोदी यांना सांगितले असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.
अमेरिकेतील हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचा साठा मर्यादित असल्यामुळे गरज असलेल्या साठीच देखरेखीखाली या गोळ्यांचा पुरवठा केला जातो. जर भारताने अमेरिकेला या गोळ्याचा पुरवठा केला तर अमेरिका भारताची आभारी राहील असेही ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिकेमध्ये भारतापेक्षा कोरोनाव्हायरसचा जास्त प्रादुर्भाव झाला असून त्या ठिकाणी 3 लाखापेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली असून 8 हजार पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत.