वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग म्हणजेच पदच्युतीचा प्रस्ताव फेटाळला गेल्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या मंत्रिगण आणि कुटुंबियांसमवेत व्हाईट हाऊस मध्ये सेलिब्रेशन केले. काल हा निर्णय झाल्यानंतर ट्रम्प आता अधिक आक्रमक आणि आत्मविश्वासपुर्ण दिसत असून त्यांनी हे सेलिब्रेशन साजरे करतानाच विरोधकांवरही तोंडसुख घेतले.
त्यांनी म्हटले आहे की मी अग्निदिव्यातून गेलो आहे. काहीही चूक केली नसताना मला ही शिक्षा, यातना भोगाव्या लागल्या आहेत. जर आयुष्यात मी काहीं चुकीचे केले असते तर ते मी निसंदिग्धपणे ते मान्य केले असते. गुरूवारी दुपारी त्यांनी व्हाईट हाऊसमधील ईस्ट रूम मध्ये हा निर्णय साजरा करण्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते. आज ही काही पत्रकार परिषद नाही,किंवा भाषणबाजी करण्याचाही दिवस नाही हा केवळ जल्लोष करण्याचा दिवस आहे असे ते तेथे उपस्थित असलेल्या लोकांना उद्देशून म्हणाले.
या प्रस्तावाच्या विरोधात आपल्या पक्षाच्या सदस्यांनी आपल्याला जे सहकार्य केले त्यांचा गौरव करताना ते म्हणाले की आमचे लोक या प्रस्तावाच्या विरोधात एखाद्या योध्यासारखे लढले. आपल्या विरोधात जे कुभांड रचले गेले त्याला कायद्याचा काहीच आधार नव्हता. आपल्या विरोधात जे आरोप आहेत त्या विषयी तुम्ही कोर्टात जा असे आव्हान मी विरोधकांना दिले होते त्यावेळी हा कोर्टाचा विषय नाही तर राजकीय विषय आहे असे म्हणत त्यांनी हा प्रस्ताव आणला. आपल्याला या साऱ्या प्रकारात मोठी अवहेलना सोसावी लागली, पहिल्यांदा त्यांनी आपल्या विरोधात रशिया रशिया म्हणून आरडाओरड केली पण ते सारेच बोगस ठरले असे ट्रम्प यांनी नमूद केले. विरोंधकांची सारीच धोरणे भयानक आणि अमेरिकेला दिवाळखोरीकडे नेणारी आहेत असेही त्यांनी आपल्या सुमारे तासाभराच्या भाषणात सांगितले.