नवी दिल्ली – बऱ्याच महिन्यांपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू असून त्यामुळे गाझामधील स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. संघर्षात आतापर्यंत ३३ हजार जणांचा बळी गेला आहे. तरीही इस्त्रायल थांबण्यास तयार नसून त्या देशाच्या या भूमिकेवर अनेक देशांनी टीका केली आहे. मात्र इस्त्रायलच्या नेतृत्वाने अद्याप आपल्या लष्कराला कोणतेही आदेश दिलेले नाहीत.
या युध्दावरून जागतिक समुदाय भडकला असताना आतापर्यंत इस्त्रायलची पाठराखण करणारी अमेरिकाही आता कठोर झाली आहे. वॉशिंग्टननेही गाझामधील गंभीर स्थितीकडे इस्त्रायलचे लक्ष वेधले आहे. सीएनएनने दिलेल्या बातमीनुसार गाझामधील परिस्थितीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात फोनवर ३० मिनिटे चर्चा झाली. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही लवकरच काहीतरी निर्णायक पाउल उचला असे बायडेन यांनी नेतान्याहू यांना सांगितले असून जर इस्त्रायलने तसे केले नाही तर त्यांना अमेरिकेचे समर्थन गमवावे लागेल असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जाणकारांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेने इस्त्रायलच्या संदर्भात आजवरच्या इतिहासात कधीच असे थेट आणि ठोस विधान केले नव्हते. त्यामुळे ही बाब इस्त्रायलकरता अत्यंत गंभीर आहे. बायडेन यांचा हा इशारा इस्त्रायल ऐकतो का आणि नेतान्याहू काय निर्णय घेतात याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.
गाझा पट्टीत इस्त्रायलचे लष्कर आणि हमास यांच्यात गेल्या पाच महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे.
त्यात ३३ हजार जणांचा बळी गेला आहे आणि निम्म्यापेक्षा अधिक नागरिक बेघर झाले आहेत. गाझातील नागरिकांना मदत शिबिरांचा आश्रय घ्यावा लागला आहे आणि अन्नधान्याच्या उपलब्धतेचेही गंभीर संकट निर्माण झाले आहे. गाझातील भीषण परिस्थिती पाहुन आता सगळ्यांनीच इस्त्रायलला बोल लावण्यास सुरूवात केली आहे.