वॉशिंग्टन – सुरक्षाविषयक कारणांमुळे चीनच्या टेलिकॉम कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करण्यास अनुमती नाकारली जाऊ शकते, असे अमेरिकेच्या जस्टीस विभागाने म्हटले आहे. अमेरिकन सरकारच्या विदेशव्यवहार, संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा मंत्रालयांनी चीनच्या टेलिकॉम कंपन्यांना अमेरिकेत पूर्ण बंदी घालण्याची शिफारस ट्रम्प प्रशासनाकडे केली आहे.
चीनच्या टेलिकॉम कंपन्यांना अमेरिकेत मान्यता देणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करण्यासारखेच आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे जनहितासाठी चीनच्या टेलिकॉम कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करण्यास बंदी घालावी आणि चीनच्या कंपन्याशी भागीदारी करून व्यवसाय करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांनाही बंदी घालण्यात यावी अशी शिफारस ट्रम्प प्रशासनाला करण्यात आली आहे. त्यावर ट्रम्प आता काय निर्णय घेणार या विषयी औत्स्युक्य निर्माण झाले आहे.
चीनी कंपन्यांनी अमेरिकेत दूरसंचार व इंटरनेटचे मोठे जाळे निर्माण केले आहे. लक्षावधी ग्राहक त्यांनी या सेवेद्वारे जोडले आहेत. चीन हा अमेरिकेतील दुसरा सर्वात मोठा टेलिकॉम ऑपरेटर आहे असे मानले जात आहे. अमेरिकेच्या सरकारने हा निर्णय घेतला तर सर्व चिनी मोबाइल धारकांची कनेक्शन्स बंद होण्याची शक्यता आहे. या दूरसंचार सेवेच्या माध्यमांतून चीन सरकार अमेरिकन यंत्रणेवर आपली हुकुमत आणि नियंत्रण लादू शकते असाही इशारा तेथील विविध विभागांनी सरकारला दिला आहे. आपल्या इंटरनेट सेवेच्या माध्यमातून चीन अमेरिकेत धोकादायक सायबर ऍक्टिव्हीटी करू शकतो, असेही विविध अमेरिकन मंत्रालयांचे म्हणणे आहे.
दरम्यान चीनने या शिफारशीला सक्त विरोध केला आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली बाजार तत्वांचे अमेरिकेन उल्लंघन करणे योग्य ठरणार नाही असे चीनने म्हटले आहे. दरम्यान ट्रम्प प्रशासनाने सरकारकडे आलेल्या या शिफारशीचा आढावा घेण्यासाठी एक समिती नियुक्त केली आहे. त्या समितीच्या अभिप्रायानंतरच ट्रम्प हे या विषयीचा महत्त्वाचा निर्णय घेतील, असे सांगण्यात येत आहे.