वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून वैद्यकीय पथकाचे अभिनंदन
मुंबई – सांगली जिल्ह्यातील मिरज येथे करोनाचे 25 रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या सर्व रुग्णांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णांपैकी चोवीस रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी रुग्णांवर उपचार करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे.
मिरज येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने या घटनेची अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली होती. सांगली जिल्ह्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होऊ नये यादृष्टीने मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यांना पूर्णपणे बरे करण्याच्या दृष्टीने डॉ. विनायक सावर्डेकर आणि डॉ. प्रशांत होवाळ यांची त्रिसदस्यीय समिती नेमली होती.
या समितीने तातडीने सांगली येथे जाऊन परिस्थितीवर नियंत्रण व उपचाराच्या नियोजनाचे काम 28 मार्च रोजी हाती घेतले होते. सांगलीतील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या लक्षात घेता गरज भासल्यास मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे 315 खाटांच्या कोविड-19 रुग्णालयात तातडीने रूपांतर करण्यात आले होते. या रुग्णालयात दाखल झालेले आणखी दोन रुग्णही लवकर बरे होतील आणि सांगली जिल्हा पूर्णपणे करोनामुक्त करण्यात आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास डॉ. पल्लवी सापळे यांनी व्यक्त केला आहे.
सांगली येथे एकूण 25 करोनाग्रस्त रुग्ण दाखल करण्यात आले होते. यानंतर यात एका रुग्णांची भर पडली होती. ज्या 24 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत त्यांचे 14 दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार असून त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. सांगली जिल्हा करोनामुक्त करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.