गोव्याच्या रिंगणातही तृणमूल घेणार उडी; पुढील वर्षीची विधानसभा निवडणूक लढवणार

पणजी  – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने गोव्याच्या राजकीय रिंगणातही उडी घेण्याचा निश्‍चय केला आहे. तो पक्ष गोव्यात पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

तृणमूलचे बंगालमधील खासदार डेरेक ओब्रायन शुक्रवारी पक्षाच्या आणखी एका नेत्यासमवेत गोव्यात दाखल झाले. त्यांच्या गोवा दौऱ्यामुळे चर्चांना उधाण आले. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ओब्रायन यांनी गोव्याच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचा तृणमूलचा इरादा जाहीर केला.

बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारून तृणमूलने सलग तिसऱ्यांदा त्या राज्याची सत्ता मिळवली. त्यानंतर त्या पक्षाने देशभरात विस्तारण्याचा संकल्प केला आहे. त्यामागे भाजपला जोरदार राजकीय टक्कर देण्याचा उद्देश आहे.

त्यातून तृणमूलने प्रामुख्याने भाजपशासित छोट्या राज्यांवर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती अवलंबल्याचे दिसते. याआधी तृणमूल त्रिपुरात राजकीय बस्तान बसवण्यासाठी सरसावला आहे. आता त्या पक्षाचा फोकस गोव्यावर आहे.

राष्ट्रीय राजकारणात महत्वाची भूमिका निभावण्याचा तृणमूलचा मानस दडून राहिलेला नाही. त्या पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून सातत्याने ममता यांचे नाव पुढे केले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.