नवी दिल्ली – सगळे भाजपविरोधक इंडिया आघाडीत एकत्र आले आहेत. मात्र प्रत्येक राज्यात या आघाडीचे नेमके स्वरूप कसे असेल याचा अद्याप आकार ठरलेला नाही. मात्र आजची परिस्थिती पाहता प. बंगालमध्ये कॉंग्रेेस- तृणमूल कॉंग्रेस आणि डावे पक्ष एकत्र येण्यापेक्षा दोन्ही कॉंग्रेस एकत्र येण्याची शक्यता अधिक प्रबळ आहे. किंबहुना कॉंग्रेसला अन्य राज्यांचा व विशेषत: केरळचा विचार करता बंगालमध्ये डाव्यांपेक्षा ममता बॅनर्जी यांच्या पक्षाशी हातमिळवणी करणे अधिक फायदेशीर ठरणार आहे.
डाव्यांची तीन दशकांची राजवट संपुष्टात आणून ममतांनी बंगाल आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळे बैठकांना जरी एकत्र बसत असले तरी ममता डाव्यांसोबत जाण्याची शक्यता कमीच आहे. मतांचे गणितही तेच सूचित करते आहे आणि केरळ या राज्यातील आपल्या संभावना लक्षात घेता बंगालमध्ये डाव्यांसोबत जाणे कॉंग्रेसलाही अप्रशस्त ठरणार आहे.
बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहे. सध्या या राज्यातून कॉंग्रेसचे २ खासदार आहेत. आता कॉंग्रेसला ६ जागा हव्या आहेत. मात्र त्यांची ही मागणी पूर्ण होणे शक्य नाही. तृणमूलच्या म्हणण्यानुसार किती जागांवर निवडणूक लढायची यावर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा किती जागांवर विजय मिळवता येईल यावर लक्ष देणे गरजेचे आहे. कॉंग्रेसची राज्यातील शक्ती पाहता कॉंग्रेस एवढ्या जागा जिंकू शकत नाही.
दुसरीकडे ममतांशी हातमिळवणी केल्यामुळे आपल्या जागा वाढू शकतात असे कॉंग्रेसला वाटते आहे. रायगंज, मालदा, मुर्शिदाबाद या जागा कॉंग्रेसला सोडण्यासाठी ममतांचे मन वळवण्यात यश मिळण्याचा विश्वास कॉंग्रेस नेत्यांना वाटतो आहे. केरळमध्ये कॉंग्रेसची खरी लढाई डाव्या आघाडीशी आहे. तसेच पक्षाची स्थिती बंगालपेक्षा या राज्यात चांगली आहे. बंगालमध्ये ममतांच्या विरोधात लढण्यापेक्षा केरळमध्ये डाव्यांच्या विरोधात लढणे आणि अधिक जागा जिंकणे कॉंग्रेसला तुलनेने सोपे जाणार आहे.
मात्र बंगालमध्ये दोन्ही कॉंग्रेसच्या चिंतेचे मुख्य कारण आहे की डाव्या पक्षांचा बहुतांश मतदार गेल्या काही निवडणुकांत भाजपकडे वळला आहे. त्याला तेथे बाम थेके राम अर्थात डावीकडून रामाकडे असे म्हटले जाते. त्यामुळे डाव्यांना सोबत घेतले नाही तर या मतदारांची मते डाव्यांकडे नाही तर भाजपकडे नक्कीच जातील आणि अंतत: भाजपला त्याचा लाभ होईल ही त्यांना भीती आहे.