कोलकता -भाजपचे ट्रॅक रेकॉर्ड पाहता त्या पक्षाच्या नेत्यांना महिला सुरक्षेवर व्याख्यान देण्याचा अधिकार नाही, असा पलटवार तृणमूल कॉंग्रेसने केला. तसेच, भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केली. तृणमूलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही उद्देशून तीन सवाल केले.
मोदींनी संदेशखाली प्रकरणाचा संदर्भ घेऊन तृणमूलवर टीकेची झोड उठवली. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना तृणमूलच्या नेत्यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली.
मोदींनी महिला शक्तीवर व्याख्यान दिले. त्यांना माझे तीन सवाल आहेत. देशात दर तासाला महिलाविरोधी ५१ गुन्हे का घडतात? लोकसभेत भाजपच्या महिला खासदारांचे प्रमाण १३ टक्केच का?
महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असणाऱ्या भाजप खासदारावर कारवाई का झाली नाही, अशी विचारणा त्यांनी केली. बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींचा भाजप नेत्यांनी सत्कार केल्याकडे तृणमूलच्या नेत्या सुष्मिता देव यांनी लक्ष वेधले. महिला सुरक्षेविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार भाजपच्या नेत्यांना नसल्याची टीका तृणमूलच्या इतर काही नेत्यांनी केली.