केंद्रीय मंत्र्यांच्या हातातील निवेदन घेऊन फाडणारे तृणमूल खासदार शांतनु सेन निलंबित

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातून निवेदनाचा कागद हिसकावून घेऊन  फाडणाऱ्या तृणमूल खासदार शांतनु सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सरकारने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्यसभेत मांडला. यावेळी अश्विनी वैष्णव यांनी तृणमूलवर हिंसेचे संस्कार असल्याचा आरोप केला. तसेच, बंगालमधील तृणमूलची हिंसक वृत्ती संसदेत आणल्याचा ठपकाही ठेवला.


केंद्रीय आयटी  मंत्री अश्निनी वैष्णव गुरुवारी संसदेत पेगासस सॉफ्टवेयरद्वारे भारतीयांच्या गुप्तहेरी प्रकरणावर बोलत होते. यावेळी तृणमूल खासदार शांतनु सेन यांनी त्यांच्या हातून कागद घेऊन फाडला आणि त्याचे तुकडे संसदेत उडवले. यामुळे वैष्णव यांना आपले म्हणणे मांडता आले नाही.


यानंतर संसदीय कार्य राज्य मंत्री वी मुरलीधरन यांनी तृणमूल खासदार शांतनु सेन यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. यानंतर, सभापती एम वेंकैया नायडू यांनी तृणमूल खासदार शांतनु सेन यांच्या या कृत्याला अशोभनीय म्हणत त्यांना या अधिवेशनातून निलंबfत करण्यात येत असल्याची माहिती दिली.

दरम्यान, या कारवाईनंतर विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. यामुळे दोन्ही सदनाची कार्यवाही दुपारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. यापूर्वी गुरुवारीही विरोधकांनी घातलेल्या गोंधळानंतर चारवेळा कार्यवाही स्थगित करण्यात आली होती. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून फक्त करोना महामारीवर चार तास चर्चा झाली आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही विषयावर चर्चा होऊ शकली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.