योगेश टिळेकरांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
महंमदवाडी – हडपसर विधानसभा मतदारसंघ भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे उमेदवार भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.26 मधील महंमदवाडी, सय्यदनगर, हांडेवाडी रोड, तरवडेवस्ती, साठेनगर, सातवनगर आदी भागात काढलेल्या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पदयात्रेचे रुपांतर रॅलीत होवून मोठा जनसागर लोटल्याने संपूर्ण प्रभाग टिळेकरमय झाला होता.
यावेळी बोलताना आमदार योगेश टिळेकर म्हणाले, आम्ही केलेल्या समाजकार्याची जाण ठेऊनच प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या पदयात्रेत सहभागी होऊन हे दाखवून दिले की, कोणी काहीही करो विजय हा सत्याचाच असतो. पैसा, दादागिरी व दंडेलशाहीच्या जोरावर माणूसकी व प्रेम मिळवता येत नाही ते स्वतःच्या अंगी असणाऱ्या माणूसकी, नम्रता व आपलेपणातून मिळते. ते विकत घेता येत नाही. त्यामुळेच हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी येथील जनता महायुतीच्याच पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे.
यावेळी नगरसेवक संजयतात्या घुले, शिवसेना नगरसेविका प्राची आल्हाट, युवा नेते अतुल तरवडे, स्वाती कुरणे, संकेत घुले, सुनील सातव, संजय सातव, सचिन घुले, शिवराज घुले, प्रमोद कुरणे, योगेश सूर्यवंशी, बाळासाहेब घुले, दादा घुले, दत्ता बापु घुले, सुनील धुमाळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना स्थानिक नागरिक म्हणाले, “आघाडीच्या लोकांनी सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंगच्या विषयावर केवळ राजकारण केले वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कोणतेही उपाययोजना केल्या नाहीत.
त्याउलट आमदार टिळेकर यांनी दोन भुयारीमार्ग करुन येथील वाहतुकीची समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही टिळेकर यांच्या पाठीशी आहोत.’