पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पुण्यातील पहिली प्रचारसभा बुधवारी अचानक पडलेल्या वादळी पावसामुळे ऐनवेळी रद्द करावी लागली. त्यानंतर गुरुवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या दर्शन घेतले. कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहेत.
राज ठाकरे यांची गुरुवारी संध्याकाळी मुंबईत दोन ठिकाणी सभा होणार आहे. त्यासाठी मुंबईला रवाना होण्यापूर्वी त्यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरे यांचे मंदिर परिसरात औक्षण करण्यात आले. अनेक कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मंदिर परिसरात उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्दयांवर आपल्या ठाकरी शैलीत व्यक्त न झालेले राज ठाकरे आता निवडणुकीच्या प्रचारात कोणकोणते मुद्दे उपस्थित करणार, सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची कोंडी करण्याचा कसा प्रयत्न करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभा संपूर्ण महाराष्ट्रात गाजल्या होत्या. त्यांनी निवडणुकीत उपस्थित केलेले मुद्दे राज्यात चर्चेत आले होते.
सोशल मीडियातही त्यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले नव्हते. पण आता विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या प्रचाराला आणखी महत्त्व आले आहे.