-->

‘संशयित, बाधितांवर नियोजनपूर्वक उपचार करा’

पुणे – पुण्यात करोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून, ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून संशयित आणि बाधित रुग्णांवर नियोजनपूर्वक वैद्यकीय उपचार करावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी केल्या.

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात ससून रुग्णालयाच्या विभागप्रमुखांसोबत बैठक घेण्यात आली. करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, पुण्यातील रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे, ही चिंतेची बाब आहे. तथापि, रुग्णांवर वेळेत आणि योग्य प्रकारे उपचार होणे गरजेचे आहे.

यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार अंमलबजावणी करावी. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार करोना प्रतिबंधासाठी विविध टप्पे निश्‍चित करून त्या-त्या विभागप्रमुखांनी आणि डॉक्‍टरांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडावी. रुग्णांचे स्वॅब तपासणीच्या नमुन्यांचा अहवाल वेळेत पाठवावा. त्यामुळे रुग्णांवर लवकर उपचार करणे सोयीस्कर होईल, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.

डॉक्‍टर, परिचारिका यांना ये-जा करण्यासाठी बसेसची सोय करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या राहण्याच्या आणि जेवणाची सोय देखील रुग्णालय परिसरातील हॉटेल्समध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी नमूद केले. करोना संशयित आणि बाधित असणाऱ्या लहान मुलांवर डॉक्‍टरांनी अधिक लक्ष केंद्रीत करावे, तसेच त्यांच्या समुपदेशनावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी केल्या. यावेळी विविध अधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.