पुणे – पीएमपीकडून सुरू केलेल्या ऑनलाइन तिकीट सेवेला प्रवासांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील अडीच महिन्यात या सेवेतून सव्वा सात लाख प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट काढले आहे. त्यामधून पीएमपीला दीड कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांच्या सोईसाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून तिकिटासाठी कॅशलेस सेवा (क्युआर कोडच्या माध्यमातून) सुरू केली आहे. या सुविधेमुळे बसमध्ये सुट्या पैशांवरून होणारे वाद कमी होण्यास मदत होत आहे. तसेच, प्रवाशांना रोख पैसे ठेवण्याची चिंता कमी झाली आहे. प्रवाशांच्या दृष्टीकोनातून ही सेवा चांगली सुरू आहे. मात्र, काही पीएमपीचे वाहकच क्युआरद्वारे तिकीट देण्यास टाळाटाळ करत असल्याचे प्रवाशांकडून तक्रारी आल्या. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने क्युआरकोडद्वारे तिकीट देताना नकार दिल्यास कारवाईचा इशारा दिला होता.
ही सेवा सुरू झाल्यानंतर दिवसाला दोन ते तीन हजार ऑनलाइन तिकीट काढत होते. आता दिवसाला १३ ते १४ हजार प्रवासी ऑनलाइन तिकीट काढत आहेत. पण, एकूण प्रवाशांच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे. त्यामुळे पीएमपीकडून ऑनलाइन तिकीट काढणाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. तसेच, प्रवाशांना माहिती होण्यासाठी प्रत्येक बसमध्ये क्युआर कोडद्वारे तिकीट उपलब्ध असे फलक ठळक अक्षरामध्ये लावावेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
सात लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी आॅनलाइन तिकीट
मागील अडीच महिन्यात (दि. 13 डिसेंबरपर्यंत) सात लाख १९ हजार २३३ जणांनी ऑनलाइन तिकीट घेतले. त्यातून पीएमपीला एक कोटी ५७ लाख ४८ हजार ३३६ रूपये उत्पन्न मिळाले आहे. दिवसाला सरासरी 9 हजार 719 ऑनलाइन तिकीट काढले जात असल्याचे दिसून येते.