पुणे – अकरावीच्या प्रवेश : सोमवारपासून भरा अर्ज

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी येत्या 27 मेपासून प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्याची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समिती अध्यक्ष व पुणे विभागाच्या प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे.

पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रात शासनाच्या निर्णयाप्रमाणे अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे कामकाज चालते. सन 2019-20 या वर्षाच्या प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी संगणक प्रणालीवर करण्यात आलेली आहे. पुण्यातील झोन प्रमुख, झोन सहायक, पर्यवेक्षीय अधिकारी, झोननिहाय संपर्क प्रमुख, तंत्रसहायक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक यांना प्रवेश प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. झोननिहाय विद्यार्थी व पालकांसाठी उद्‌बोधन वर्गही घेण्यात आले आहेत. या वर्गाला सर्वच ठिकाणी विद्यार्थी, पालक यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. प्रवेशाच्या माहिती पुस्तिका बालभारतीकडून प्राप्त झाल्या आहेत. या पुस्तिकेचे पुणे शहर विभाग, कर्वेनगर-कोथरुड-वारजे, पर्वती-धनकवडी-स्वारगेट, सिंहगड रोड, कॅंम्प-येरवडा, हडपसर-कोंढवा-खराडी, शिवाजीनगर-औंध-पाषाण-खडकी, पिंपरी-सांगवी-भोसरी, चिंचवड-आकुर्डी-निगडी या झोननिहाय त्यांचे वितरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी दहावीचे शिक्षण घेऊन परीक्षा दिलेल्या संबंधित शाळांमधून विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका वाटपासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

शासनाकडून प्रवेश प्रक्रियेतील अर्जातील भाग-1 भरण्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचे पत्र नुकतेच कार्यालयाला प्राप्त झाले आहे. त्यानुसार प्रवेशाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकेचा नीट अभ्यास करुन ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या सूचना त्यांना उद्‌बोधन वर्गात देण्यात आलेल्या आहेत. माहिती पुस्तिकेत विद्यार्थ्यांना लॉगिन आयडी व पासवर्ड उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. याचा वापर करुनच विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज संकेतस्थळावर भरता येणार आहे. येत्या सोमवारी (दि.27) सकाळी 11 वा.पासून ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अर्जाचा भाग-1 हा दहावी परीक्षेच्या निकालापूर्वी भरता येणार आहे. निकालानंतर अर्जाचा भाग-2 भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.