57 जणांच्या बदल्या : सहा कर्मचाऱ्यांना मिळाली बढती
पिंपरी – महापालिकेत बदल्यांचा हंगाम सुरू झाला असून 57 जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कार्यालयीन अधीक्षक, प्रशासन अधिकारी, “ड’ संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याखेरीज सहा अधिकाऱ्यांना कार्यालयीन अधीक्षकपदी बढती देण्यात आली आहे.
महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात 2015 मध्ये धोरण निश्चित करण्यात आले आहे. दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. त्यानुसार एकाच ठिकाणी तीन वर्ष पूर्ण झालेल्या 91 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दोन टप्प्यात अंतर्गत बदल्या केल्या आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बढत्या आणि बदल्या केल्या आहेत. परशुराम वाघमोडे, विजय गायकवाड, राजेश तांबडे, सविता आगरकर, प्रकाश बने, संभाजी घुले यांना कार्यालयीन अधीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. तर, सात कार्यालयीन अधीक्षकांच्या, 11 प्रशासन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच ड संवर्गातील 39 कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत.
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे. रुजू न झाल्यास, बदली आदेशाचा अवमान केल्यास तसेच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे राजकीय दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा गोपनीय अहवालात त्याबाबतची नोंद घेण्यात येईल. शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.