पुणे – लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी खडकी येथील बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुप आणि सेंटरच्या शताब्दी निमित्त विस्तारित बॉम्बे सॅपर्स युद्धस्मारक देशाला समर्पित केले. युद्ध स्मारकाच्या शताब्दीनिमित्त, बॉम्बे सॅपर्स युद्ध स्मारकाचा सन्माननीय दर्जा कायम राखणारे एक विशेष टपाल तिकीटही लष्करप्रमुखांच्या हस्ते जारी करण्यात आले.
बॉम्बे सॅपर्स युद्ध स्मारक ही सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ उंच उभी असलेली पवित्र इमारत आहे. विस्तारित युद्धस्मारकात प्रत्येक पराक्रमी सैनिकांची नावे असलेल्या भिंतींच्या दोन कमानदार पंक्ती उभ्या करण्यात आल्या आहेत. सोबतच, अभ्यागतांना सैनिकांचे नाव शोधता यावे यासाठी एक डिजिटल किओस्क स्थापन करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शीख लाईट इन्फंट्री आणि मराठा लाईट इन्फंट्री मार्चिंग दलाच्या सैनिकांसह 3000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना, लष्करप्रमुखांनी लष्कराच्या क्षेत्रीय संरचना, लढाऊ अभियात्रिकी आणि इतर राष्ट्रउभारणी उपक्रमांसाठी बॉम्बे सॅपर्सच्या उत्कृष्ट व्यावसायिकतेबद्दल त्यांचे अभिनंदन केले. अभियंता युनिटने लडाखच्या खडतर प्रदेशात केलेल्या उत्कृष्ट कामापासून ते उत्तर सिक्कीममधील ओपी तिस्ता नदी प्रदेशातील भूमिकेपर्यंत दिलेल्या योगदानाबद्दल लष्कर प्रमुखांनी समाधान व्यक्त केले.