संगमनेर – बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणारे वन विभागाच्या जाळ्यात सापडले असून त्यांच्याकडून मृगया चिन्ह, दात, सुळे, मिशा आदी अवयव ताब्यात घेण्यात आले. बेकादेशीर विक्री करताना वनखात्याच्या पथकाने तिघांना रंगेहात पकडल्याची घटना शनिवारी तालुक्यातील चंदनापुरी परिसरात घडली.
संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे. यात अनेक बिबट्यांचा अपघाती मृत्यू होतो. तर कधी या बिबट्यांची शिकार होत असणार हे आज झालेल्या कारवाईतून समोर येते आहे. शुक्रवारी तालुक्यातील चंदनापुरी येथील आनंदवाडी परिसरात बिबट्यांचे दात, सुळे, मिशा यांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती वन खात्याला मिळाली.
बिबट्यांच्या अवयवाची विक्री होत असल्याची खातरजमा करण्यासाठी वन खात्याच्या पथकाने सापळा रचला रचला.या पथकातील कर्मचारी बनावट ग्राहक बनुन आनंदवाडी येथे संबंधित आरोपींना भेटले. हे आरोपी या पथकाच्या जाळ्यात अलगद अडकले.
बिबट्यांच्या अवयवांची विक्री केल्याप्रकरणी वन खात्याने श्रीराम यादव सरोदे (वय 34), सुधिर विजय भालेराव (वय 30) (फरार आरोपी) सुशांत उत्तम भालेराव (सर्व रा. आनंदवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. पुढील तपास उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील आणि उपवनसंरक्षक जुन्नर अमोल सातपुते व योगेश वरखड यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. वनपरिक्षेत्र संगमनेर भाग-1 चे सचिन लोंढे, रईस मोमिन, संदीप येवले, कुणाल घुले, तन्मय बागल, हारुन सव्यद, विक्रांत बुरांडे, अरुण देशमुख, गजानन पवार यांनी कार्यवाही केली.