पाथर्डी – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुभाष बर्डे तर उपसभापतीपदी कुंडलिक आव्हाड यांची निवड बिनविरोध झाली.आ. मोनिका राजळे यांना संचालकांना पदाधिकारी निवडीचे अधिकार दिले होते. त्यानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आमदारांनी नीती आखल्याचे पदाधिकारी निवडीवरून स्पष्ट झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विशेष लेखा परीक्षक सुनील खर्डे यांनी काम पाहिले. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, वृद्धेश्वरचे संचालक राहुल राजळे, कुशीनाथ बर्डे, ज्येष्ठ नेते संजय बडे, मढी देवस्थानचे अध्यक्ष राधाकिसन मरकड, अशोक मंत्री, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर उपस्थित होते.
या वेळी बोलताना आ. राजळे म्हणाल्या, पूर्वीच्या संचालकांनी काय केले. यापेक्षा निवडणूक संपली आता विषय विकासाचे असतील. इतर विषयांकडे लक्ष न देता आपल्याला कशा पद्धतीने कारभार करायचा आहे. यावर भर द्यावा लागेल. इतर समित्यांचा कारभार पाहण्यासाठी संचालकांनी संयुक्त दौरे करावेत. मुख्य बाजार समितीसह उपबाजार समित्यांमध्ये सुद्धा मूलभूत सुविधा व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वांगीण प्रगतीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील.
तिसगाव उपबाजार परिसरात कोल्ड स्टोरेजची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. बाजार समितीमध्ये एक हाती सत्ता मिळाल्याने कार्यकर्त्यांनी गाफील न राहता आगामी सर्वच निवडणुकांसाठी सज्ज व्हावे. प्रास्ताविक बाळासाहेब अकोलकर, सूत्रसंचालन राजू सुरवसे, तर आभार संचालक अजय रक्ताटे यांनी मानले.