नवी सांगवीला समस्यांचा विळखा

वाहतूक समस्या गंभीर : नागरिकांमधून व्यक्‍त होतोय संताप

पिंपळे गुरव – नवी सांगवी परिसराला विविध समस्यांनी घेरले आहे. रस्त्यावर कुठे सिग्नल बंद आहे तर कुठे गतिरोधक नाहीत. पार्किंगची सोय नसल्यामुळे रस्त्यावर कुठेही वाहने उभी केली जातात. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. कचरा साचलेला दिसून येतो. या समस्यांकडे लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनाने डोळेझाक केल्याने नागरिक संताप व्यक्‍त करीत आहेत.

नवी सांगवी हा शहरातील एकेकाळचा विकसित भाग होता. परंतु, वाढत्या नागरीकरणाबरोबरच येथील समस्यांनी डोके वर काढले आहे. येथील महेश्‍वरी चौक परिसरात मोठा रस्ता आहे. परंतु, वाहन चालक रस्त्यावरच वाहने उभी करतात. या वाहनांमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नाहीत. यामुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे. सायंकाळी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व लहान मुले बसलेले असतात. तसेच चारचाकी वाहनांचा आडोसा घेत तळीराम ठाण मांडून बसलेले असतात. याचा लहान मुलांवर परिणाम होतो. त्याचबरोबर महिला वर्गात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

एम. एस. काटे चौक येथील गतिरोधक तुटलेल्या अवस्थेत आहेत. या रस्त्यावर पांढरे पट्टे देखील नाहीत. यामुळे नागरिकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण समोरून येणाऱ्या वाहनांना हे पांढरे पट्टे नसल्याने गतिरोधक दिसत नाही. अशीच अवस्था साई चौकातील आहे. येथील समस्यांमुळे नागरिक वैतागले आहेत. याकडे कुणाचेच लक्ष नाही. अशी ओरड नागरिकांधून सुरु आहे. येथे बेशिस्त वाहतुकीमुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. यामुळे सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तसेच साई चौकातील सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. सिग्नल बंद असल्याने वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. येथे कोणीच थांबत नाहीत. जवळच सांगवी पोलीस ठाणे आहे. तरी देखील येथील सिग्नल बंद कसा? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

साई चौकातून औंध व पिंपळे गुरव व पिंपरी अशा ठिकाणाहून वाहने ये-जा करतात. येथे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. सिग्नल बंद असल्यामुळे सायंकाळच्या सुमारास वाहन चालकांचा खोळंबा होतो. अशीच परिस्थिती नवी सांगवीतील आहे. शिवनेरी कॉलनीतील व अन्य भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. ते बंद अवस्थेत आहेत. यामुळे अपघात अथवा काही अनुचित प्रकार घडल्यास यास जबाबदार कोण? अशी चर्चा सर्व सामान्य नागरिकांमधून सुरु आहे.

शिस्त पाळा, वाहतुकीचे नियम पाळा व वाहने सावकाश चालवा. डावी उजवी बाजू पाहून वाहन चालवा, असे पोलिसांकडून सांगितले जाते. परंतु, बेशिस्त वाहतुकीमुळे व वाहनतळाची सोय नसल्याने वाहतूक समस्या तीव्र झाली आहे. अनेक शाळकरी, मुले, कामगार, महिला वर्ग या ठिकाणी ये-जा करतात. साईड पट्टे, दिवे, रिफ्लेक्‍टर, दिशादर्शक फलक यांचा अभाव आहे. पायाभूत सुविधांच्या प्रश्‍नांकडे महापालिका प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

नवी सांगवी परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहने उभी केलेली असतात. याबाबत अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलीस विभागास पत्र दिले आहे. यावर लवकरच कारवाई करण्यात येईल. तसेच या परिसरात बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करण्यात येतील. रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात येईल. जी काही कामे शिल्लक करावयाची आहेत. ती आचार संहिता संपल्यावर करण्यात येणार आहेत. नागरिकांना होणार त्रास नक्कीच दूर करण्यात येईल.
– अंबरनाथ कांबळे, स्थानिक नगरसेवक

Leave A Reply

Your email address will not be published.