बहुतांश एटीएममध्ये रोख नाही, तर काही आउट ऑफ सर्व्हिस
पुणे – दिवाळीनिमित्त एकीकडे बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र, त्याचवेळी शहरातील बहुतांश एटीएममध्ये रोख पैसे नाहीत, तर काही ठिकाणी आउट ऑफ सर्व्हिस असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या कॅशलेस, आउट ऑफ सर्व्हिस एटीएममुळे नागरिकांना बराचकाळ रांगेत उभे रहावे लागत असून, अनेक ठिकाणी अशा रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.
आगामी दिवाळी सणानिमित्त खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. मात्र, मोठ्या उत्साहाने खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना खरेदीऐवजी एटीएमच्या रांगेत थांबावे लागत आहे. बाजारात काही ठिकाणी केवळ रोखीनेच व्यवहार होत असल्याने विशेषत: किरकोळ व्यवहार हे रोखीनेच होत असल्याने रोख रक्कम काढण्यासाठी एटीएमम शोधत असतात, बहुतांश एटीएम ही कॅशलेस अथवा आउट ऑफ सर्व्हिस असतात. अशावेळी उपलब्ध असलेल्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहून बराचवेळ जात असल्याने, नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
व्यावसायिकांकडून रोख पैशांची मागणी
लक्ष्मी रस्ता परिसरात खरेदीसाठी आलेल्या सुश्मिता चव्हाण म्हणाल्या, “हल्ली एटीएम कार्डनेच व्यवहार करत असल्याने जास्त रोख पैसे जवळ ठेवत नाही. मात्र, काही दुकानांमध्ये सर्वरची समस्या होत असल्याने केवळ रोख पैशांची मागणी केली जाते. त्यामुळे पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेले तर, तो आउट ऑफ सर्व्हिस होता. मी मोबाइलवर जवळचा एटीएम शोधला तर, त्याठिकाणी पैसे उपलब्ध नव्हते. बराचवेळ शोधल्यानंतर एक एटीएम केंद्र मिळाले परंतु त्याठिकाणी आधीपासूनच गर्दी होती. दोन मिनिटांच्या कामासाठी तब्बल 20 मिनिटे वाट पहावी लागली. माझ्याप्रमाणे आणखी काही नागरिकांनाही असा त्रास सहन करावा लागला.’