पुणे – कोरेगाव भिमा जवळील पेरणे फाटा येथे नागरिक विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात, त्यामुळे शुक्रवारी (दि. 1 जानेवारी) पुणे-अहमदनगर मार्गावरील पेरणे फाटा येथे वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिले आहेत.
अग्निशामक दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराकडून, नगररस्त्याकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना (पेरणे फाटा रणस्तंभाकडे जाणारी वाहने वगळून) 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून 1 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.
असा आहे पर्यायी मार्ग
- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी नगर रस्त्यावरील खराडी बायपास चौक येथून उजवीकडे वळून हडपसर-सोलापूर रस्ता-केडगाव-चौफुलामार्गे न्हावरा शिरूर नगर रस्त्याहून अहमदनगरकडे जावे. येरवडा-विश्रांतवाडी-आळंदी मार्गे-चाकणला जावे.
- सासवड, कात्रज बायपास रस्त्याकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी हडपसर गाडीतळ पुलाखालून उजवीकडे वळून सोलापूर रस्त्याने मांजरी फाटा-15 नंबर लक्ष्मी कॉलनी चौक येथून आणि सातारा रस्त्याहून येणाऱ्या वाहनांना हडपसर येथून सोलापूर महामार्गाहून चौफुला मार्गे न्हावरा शिरूर नगर रस्त्याहून अहमदनगरकडे जावे.