पिंपरी- अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका असा क्रिकेटचा सामना सोमवारी (दि. 30) गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होत आहे. हा सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येणार असल्याची एकंदर परिस्थिती आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्यायी मार्गाबरोबरच पार्किंगची व्यवस्था केली आहे.
जुना मुंबई पुणे महामार्गाने येणारी वाहने सोमाटणे फाटा, सेन्ट्रल चौक मार्गे बेंगलोर महामार्गावरील मामुर्डी जकात नाका जवळील अंडरपास व रस्त्याने येणाऱ्या वाहनांना शितळादेवी मंदिर येथून मामुर्डी गावात येण्यास बंदी आहे. यासाठी पर्यायी मार्ग – जुना मुंबई पुणे महामार्गाने येणारी वाहने शितळादेवी मंदिर येथून डाव्या बाजूने वळून लेखा फार्म मार्गे असलेल्या सर्विस रोडने स्टेडीयमकडे व पार्किंगकडे जातील.
निगडी, हॅंगिंग ब्रिजकडून येणारी वाहने रावेत चौक, भोंडवे चौक, मुकाई चौक मार्गे कृष्णा चौक येथून उजव्या बाजूला वळून परत द्रुतगती मार्गाच्या डाव्या बाजूला वळून सर्विस रोडने स्टेडीयम व पार्किंगकडे जातील. स्टेडीयम कडून साईनाथनगर मार्गे जुना मुंबई पुणे महामार्गाकडे येणारा रस्ता एकतर्फी फक्त जाण्यासाठी वापरण्यात येत आहे. साईनाथनगर मार्गे स्टेडीयमकडे येण्यासाठी प्रवेश बंदी आहे.
सेन्ट्रल चौक – साईनगर मार्गे कानेटकर बंगला चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आहे. मैदानाकडे प्रेक्षक येताना व सामना संपल्यानंतर परत जाताना त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना मज्जाव केला जाईल.