संगमनेर – सकल मराठा समाजातर्फे संगमनेर शहरात बुधवारपासून साखळी उपोषण करण्यात येत आहे. रविवारी उपोषणाच्या पाचव्या दिवशी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले असता तिघांनी “परत जा परत जा’ विखे-पाटील परत जा’ अशी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तेथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या तिघांना तात्पुरते ताब्यात घेऊन समज करून सोडण्यात आले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्या समर्थनात संपूर्ण राज्यभरात सकल मराठा समाजातर्फे अत्यंत शांततेच्या व सनदशीर मार्गाने साखळी उपोषण सुरू आहे. अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
संगमनेरमध्येही काही गावांमध्ये गावबंदी असताना मंत्री राधाकृष्ण विखे हे फक्त राजकीय उद्देश ठेवून साखळी उपोषणास भेट देण्यास आले. खरे तर राज्यातील अनेक नेत्यांनी संघर्ष टाळण्यासाठी दौरे रद्द केले आहेत, मात्र तरीही विखे राजकीय हेतू ठेवून आल्याने तेथे उपस्थित असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या युवकांनी परत जा, परत जा विखे पाटील परत जा म्हणून घोषणाबाजी केली.
आ. थोरात यांच्यावेळी हे आंदोलकर्ते कोठे गेले
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील येण्याच्या एक तास अगोदर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही या साखळी उपोषणात हजेरी लावली होती. यावेळी ते आंदोलक कुठे गेले होते असा प्रश्न विचारला जात आहे. तर विखे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की पुढाऱ्यांना गावबंदी आहे मग कॉंग्रेसचे नेते येतात. त्यावेळी त्यांना कोणी विरोध करत नाही, ते आ.बाळासाहेब थोरात यांचे समर्थक होते, त्यांना शिकवून पाठवले होते, हे फक्त राजकारण करतात, हे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया विखे यांनी दिली.