पुणे – आंबेगाव खुर्द येथील सिंहगड कॉलेज ऑफ आर्टस, कॉर्मर्स ऍण्ड सायंन्समध्ये ट्रॅडिशनल डेच्या दिवशी हाणामारी झाली. एका सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने महाविद्यालयाती विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. “तु माझे ऐकत नाही का? मी भाई आहे, या कॉलेजचा असे म्हणत सुमारे अर्धा तास राडा घातला. याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक केली आहे.
सराईत गुन्हेगार विकास उर्फ विकी चावडा, मोहन राठोड, चेतन थोरे आणि साहिल गायकवाड अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर इतर सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी अथर्व दिपक चौधरी (चंद्रभागा निवास, धनकवडी) हा महाविद्यालयात शिक्षण घेतो. गुरुवारी महाविद्यालयाचा ट्रॅडिशनल डे होता. यातील काही आरोपी पुर्व अथर्वच्या शाळेत शिक्षण घेत होते. तेव्हा त्यांच्यामध्ये वाद झाले होते. याचा राग मनात धरुन आरोपींनी अथर्वला दुपारी साडेबाराच्या सुमारास महाविद्यालयाच्या परिसरात गाठले.
त्याला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून महाविद्यालयाच्या पार्किंगमधून बाहेर गल्लीत नेले. तेथे विकासने मी भाई आहे इथला असे म्हणत साथीदारांच्या मदतीने लाकडी बांबु आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आजूबाजूच्या दुकानदारांन व नागरिकांना मदतीला कोणी आले तर तुम्हालाही धमकावेल अशी धमकी दिली. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक घोगरे करत आहेत.